www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यावरुन आता वाद सुरु झालाय.. मात्र या शिवाजी पार्क मैदानाचा एक इतिहास आहे.. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेले 28 एकरचे हे मैदान 1925 साली मुंबई महापालिकेने उभारले.. कबड्डी आणि मल्लखांबसारख्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 1949 साली या मैदानात समर्थ व्यायाम मंदिरची स्थापना करण्यात आली..
1950 च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आचार्य अत्रे यांची या मैदानातून दिलेली भाषणंही गाजली.. 1965 साली भारतानं पाकवर मिळवलेल्या युद्धाचा विजयोत्सवसुद्धा याच मैदानात साजरा करण्यात आला.. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केलं.. 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना याच मैदानातून केली..
दिग्गज क्रिकेटरमुळंही शिवाजी पार्क नावारुपाला आलंय.. संदीप पाटील, अजित वाडेकर, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांनी याच मैदानात क्रिकेटचे धडे गिरवले... पण तेथील काही स्थानिक रहिवाश्यांचा या स्मारकाला विरोध असल्याने आता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार की नाही याबाबत वाद सुरू झाला आहे.