बाळासाहेबांच्या नावे मुंबईत आरोग्य विद्यापीठ!

मुंबईत आता मुंबई महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2012, 09:36 AM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईत आता मुंबई महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.

मुंबईकरांना आरोग्य सेवा देणार्याय महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत केईएम, नायर, शीव तसेच नायर दंत महाविद्यालय अशी चार वैद्यकीय महाविद्यालये चालविली जातात. त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिलम उपनगरातही आणखी दोन नवी वैद्यकीय महाविद्यालये पालिका लवकरच उभारणार आहे, तसा प्रस्ताव विचाराधीन आहे.
ही सर्व वैद्यकीय महाविद्यालये आता पालिकेच्या आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून चालविली जाणार आहेत. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. जनतेच्या हिताबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच केली. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाला बाळासाहेबांचे नाव देण्याचे मत शेवाळे यांनी व्यक्त केले.
रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका देणारी शिवसेना ही देशातील पहिलीच संघटना. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांसारख्या लोकोत्तर महापुरुषाच्या नावाने हे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणे म्हणजे महापालिकेचाच सन्मान असेल असेही शेवाळे म्हणाले.

आरोग्य विद्यापीठ उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारशी चर्चा केली आहे. पालिका आयुक्त आणि प्रशासनानेही या विद्यापीठासाठी पूर्णपणे सहमती दर्शवली आहे. त्यासाठी पालिकेने सल्लागारही नेमला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. संध्या कामत यासाठी पाठपुरावा करीत आहेत. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सरकारला लवकरच पाठविण्यात येणार आहे.
कोठे असणार विद्यापीठ?
साधारण एक हजार ते दीड हजार कोटी इतका खर्च महापालिका स्वत: करून हे आरोग्य विद्यापीठ उभारणार आहे. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या परिसराची जागा त्यासाठी निश्चिरत करण्यात आली असून ५ लाख चौरस फुटांवर उभारण्यात येणारे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या विद्यापीठाच्या सभोवती पाच हजार चौरस मीटर परिसरात सुंदर बगीचा तयार करण्यात येणार आहे.