होळी करा अशी साजरी, मिळवा व्याधींपासून मुक्ती

`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.

Updated: Mar 26, 2013, 07:50 AM IST

www.24taas.com, मुंबई
`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो. `हुताशनी`, असेही होळीला नाव आहे. देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी करतात. होळीमध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचतात.
होळी पेटवण्याकरता जो अग्नी आणतात, तो चांडाळाच्या घरचा आणायचा असतो ! नंतर व्रतकर्त्याने स्नान करून `ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं समस्तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनं अहं करिष्ये ।`, असे म्हणून व नंतर `होलिकायै नम: ।`, हा मंत्र म्हणून होळी पेटवायची. त्यानंतर होळीची प्रार्थना करायची.
वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च । अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ।।
होलिका माता तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग !)