पुणे : ( अतुल लांडे, पुणे ) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
क्लासचा पूर्वीचा निकाल अभ्यासणे गरजेचे आहे. क्लासेस च्या जाहिराती , फेसबूक पोस्ट यावर संपूर्ण विश्वास ठेवू नका. बरेचसे पास झालेले विद्यार्थी एकाच वेळेला वेग वेगळ्या क्लासेस मध्ये मार्गदर्शन घेत असतात. उदा. विद्यार्थी मुलाखतीची तयारी करताना सगळीकडेच सराव मुलाखत (मॉक) देतात. त्यामुळे तो क्लास लगेच तो विद्यार्थी आपलाच आहे असा दावा करु शकतो.
काही क्लासेस तर अभ्यासिका चालवतात आणि तिथले विद्यार्थी आपलेच आहेत असा दावा करू शकतात. काही क्लासेस मध्ये तर तुम्ही पास झाल्यानंतर भेटायला गेलात तरी तुम्ही त्या क्लासचे होऊन जाता.
काही मार्गदर्शक एखाद्याला मानसिक आधार देतात, लगेच तो त्यांचा होतो, त्याचे नाव क्लासच्या यादीत जाते, आणि तुम्ही तो क्लास लावता--- मानसिक आधारासाठी नाही तर एखादा विषय शिकण्यासाठी...
काही वेळेला एखाद्याने तो क्लास केलेला असतोही पण म्हणून तो क्लास त्याला आवडलेला असतोच असेही नाही... त्यामुळे क्लासच्या निकालामागचे गौडबंगाल समजून घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे...
जर तुम्हाला पूर्व वा मुख्य परीक्षेसाठी क्लास लावायचा असेल तर त्या क्लासने दावा केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यानि तीच बॅच केली असेल असे नाही. तुम्हाला ज्या विषयासाठी क्लास लावायचा असेल त्या विषयाचा त्या क्लासचा निकाल कसा आहे हे पडताळून पाहणे गरजेचे आहे.
पुढच्या पोस्ट मध्ये चर्चा करूयात 'शिक्षकांच्या' महत्त्वाची......