एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...

Updated: Jul 13, 2015, 11:54 PM IST


प्रशांत जाधव

प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM

रविवार सायंकाळी ४.४५ ची वेळ... सीएसटी स्टेशनवर ४.५२ ची कसारा फास्ट लोकल... लोकल ठाण्यापासून स्लो... या गाडीत माझे सासरे, मेव्हणी आणि ३ वर्षांचा मुलगा बसला... त्यांनी आपली बॅगवर रॅकवर टाकली. फास्ट ट्रेन ठाण्यानंतर स्लो होणार यामुळे त्यांनी उतरून दुसरी फास्ट ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला आणि याच ठिकाणी सुरू झाला एका बॅगचा एकट्याने प्रवास.... 

गाडी सुटली...
सासरे, मेव्हणी आणि मुलगा या गाडीतून उतरले... पण ते रॅकवर ठेवलेली बॅग विसरले. खाली उतरल्यावर पाच सहा मिनिटांनी त्यांना आठवले की आपण बॅग घेतलीच नाही. पण जेव्हा आठवले तेव्हा गाडी सुरू झाली होती. सासरे वयोमान ६६ वर्ष.. बॅग घेण्यासाठी गाडीमागे धावले. प्लॅटफॉर्मच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ते पळत गेले. पण त्यांना काही गाडी पकडता आली नाही.

रेल्वे पोलिसांकडे तक्रार....
यानंतर बॅग गाडीत राहिल्याची तक्रार सासरे आणि मेव्हणीने रेल्वे पोलिसांना   ९८३३३३११११ या क्रमांकावर केली.  त्यांनी सांगितले की पुढच्या स्टेशनला आम्ही सांगतो, असे सांगून बॅगचे डिटेल्स आणि डबा विचारला. बॅगेत काय आहे हे देखील विचारले, पण त्या बॅगेत मुलाच्या शाळेचे पुस्तकं, जेवणाचा डबा आणि काही कपडे होते. त्यांनी हे ऐकल्यावर फोन ठेवला. पुन्हा मेव्हणीने कॉल केला त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही कुर्ल्याला गाडी चेक केली. पण अशा बॅग सापडली नाही. सासऱ्यांनी आणि मेव्हणीने बॅगची आशा सोडली. 


एम एडिकेटर

एम इंडिकेटरच्या आयडीयाची कल्पना....
मेव्हणीने माझ्या बायकोला फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली. बायको ड्युटीवर असल्याने ती काहीच करू शकत नव्हती. दरम्यान, मला सुट्टी असल्याने मी घरीच भारत-झिम्बाव्बे सामन्याचा आनंद घेत होतो. बायकोने मला फोन केला. तिने घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा ४ वाजून २९ मिनिटे झाले होते. माझ्याकडे अजून २७ मिनिटे होती. मग मी कसेबसा तयार झालो आणि थेट डोंबिवली स्टेशन गाठलं. रिक्षातून जाताना एम एडिकेटर पाहिले. सीएसटीवरून सायंकाळी ४.५२ ची कसारा फास्ट लोकल डोंबिवलीला सायंकाळी ५.५६ ला पोहचते. तर त्या अगोदर कोपर स्टेशनला ५.४९ असते. त्यामुळे मी डोंबिवली स्टेशनला पोहचल्यावर प्रथम कल्याणचे तिकीट काढले. त्यानंतर उलट्या दिशेने म्हणजे गाडी जेथून येणार त्या दिशेने जाण्याचे ठरविले. ४.४१ मिनिटांनी सीएसटीला जाणारी लोकल पकडली आणि कोपर स्टेशनला गेलो. 
कोपर स्टेशनला जाण्यापूर्वी मेव्हणीला फोन केला आणि तिला कोणत्या डब्यात बॅग विसरले, कोणत्या कलरची बॅग होती हे जाणून घेतले. त्यानुसार कोपर स्टेशनला ५ वाजून ४६ मिनिटांला पोहचलो. 


 

मुलाचे पुस्तकचं पुरावा.... 
मी डोंबिवली स्टेशनला जाण्यापूर्वी मुलाचे एक पुस्तक माझ्यासोबत घेतले. शर्टाचे एक बटण उघडलं आणि कसंबसं पुस्तक टाकलं. आता कोपर स्टेशनला उतरल्यावर ४ वाजून ४९ मिनिटांची कसारा फास्ट लोकल जी ठाण्यानंतर स्लो होते तिची वाट पाहत होतो. सीएसटीकडून लेडीज डब्यानंतर असल्या पहिल्या जनरल डबा जिथे येतो त्या ठिकाणी उभा राहिलो. मनात अनेक विचार येत होते. पण पॉझिटीव्ह विचार करा. तसंच घडतं... मी विचार केला ती बॅग त्या ठिकाणी पडली असेल... कोणी हात लावला नसेल... असा पॉझिटीव्ह विचार घेऊन प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो. इंडिकेटवर कसारा लोकल १ मिनिटांनी असे दाखवत होते. गाडी दूरवरून जसजशी दिसत होती तसतशी धडधड वाढत होती.

अखेर ती गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि मी पुढच्या दरवाज्याने गाडीत शिरलो. गाडीत खूप गर्दी होती. रॅकवर नजर फिरवली तर आ्रपल्या ओळखीची बॅग दिसत नव्हती. गर्दीतून वाट काढून हळूहळू पुढे जात होतो. डब्याच्या दुसऱ्या दरवाज्याजवळ आलो. बॅग काही दिसत नव्हती. आता डोंबविलीला उतरण्याची गडबड सुरू झाली. शेवटच्या दरवाजाकडे येत असताना एका व्यक्तीने त्याची लॅपटॉप बॅग काढली आणि मला खूप हायसं वाटलं. त्या कोपऱ्याच्या रॅकवर निळ्या बेल्टची काळी बॅग पडली होती. तिच्याकडे गेलो आणि तिथं विचारलं ही बॅग कोणाची कोणी? तर कुणीही उत्तर दिलं नाही. मग ती बॅग उघडली आणि मुलाचे पुस्तकं त्यात होते. त्या पुस्तकांना मी कव्हर लावले होते.  माझ्याकडचे तिसरे पुस्तक शर्टाचं बटण उघडून प्रवाशांना दाखवलं.. हे पुस्तकंच पुरावा होतं की, ती बॅग माझी होती. बॅग घेतली सर्वांना फोन केले.

पप्पा हिरो.... 
मी बॅग शोधून काढली आणि मिळवली, याने माझ्या घरी खूप आनंद झाला. बॅग जाण्याचे दुःख नव्हते, पण त्यातील मुलाचे पुस्तक हे सासरच्या मंडळी आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मी सर्वांना फोनकरून सांगितल्यावर त्यांना माझ्या युक्तीचं कौतुक वाटलं. मुलगा घरी आला. त्यावेळी त्याने घडलेला किस्सा मला सांगितला, पण मी ती बॅग शोधून आणल्याचा किस्सा तो प्रत्येकाला सांगू लागला आणि आपला पप्पा कसा हिरो आहे हे सांगतं होता.

बॅग सापडली त्यात काही महत्त्वाचे नव्हते, पण रेल्वे पोलिसांची निष्क्रियता या ठिकाणी दिसून आली. त्यांना वेळीच कळवून सुद्धा, त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. त्यांनी आपण कारवाई केल्याचं सांगितलं आणि काम संपवलं. टेक्नॉलॉ़जी आणि लॉजीक याच्या आधारे ही बॅग सापडली. त्या बॅगेत खूप मोठी रक्कम असल्याचे सांगितले असते, तर त्यांनी कारवाई केली असती का?, आमची काही मौल्यवान वस्तू त्यात नव्हती, पण मौल्यवान वस्तू असेल तरच पोलिस आपले कर्तव्यदक्षता दाखवतील का. असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

काही दिवसांपूर्वी माझा मित्र जयवंत पाटील याचा आयफोन हरवला, त्याची तक्रारही त्याने पोलिसांकडे नोंदवली. पण आयफोन ट्रॅकरने तो शोधून काढला. यात पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. त्यांनी ठरवले असते तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, तो फोन आयएमईआय नंबरच्या आधारे शोधून दिला असता. 

मी बॅग मिळवली किंवा जयवंतने त्याचा फोन मिळवला, यात आम्हांला वैयक्तीक समाधान मिळाले. पण असे अनेक नागरीक आहेत, त्यांच्या वस्तू हरवतात, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती नसते म्हणून ते काहीच करू शकत नाही आणि त्यांना आपल्या वस्तूंवर पाणी सोडावे लागते. पोलीस दलातील सर्वच पोलीस एक सारखे असतात असे नाही, काही कर्तव्य दक्षही असतात. पण आपण म्हणतो तो प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे. पण प्रत्येक पोलीस प्रामाणिक असणे आणि कर्तव्यदक्ष असणे हा त्याचा प्रथम क्रायटेरिया असतो. तो क्रायटेरियाच ते विसरून जाता आणि जनतेची सेवा करण्यात कमी पडतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.