ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...

नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 20, 2017, 05:48 PM IST
ब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं... title=

शुभांगी पालवे, झी मीडिया, मुंबई : नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...

कासवांचं जीवनमान, कासवांच्या दुर्मिळ प्रजातींचं संरक्षण करण्याची काही सामाजिक कार्यकर्त्यांची धरपड आणि सध्याच्या बदललेल्या जगात नात्यांची गुंतागुंत  अलगद या सिनेमात गुंफली गेलीय. हा सिनेमा विशेष भावला तो या सिनेमातील सहज अभियन, फारशा नाटकी नसलेल्या आणि अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफलेल्या शब्द रचनांमुळे... ‘birds from same feathers can form a family’ म्हणत या सिनेमानं एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी कासवांच्या जगण्याच्या पद्धतीचा अतिशय जवळून अभ्यास करण्यात आल्याचं पदोपदी जाणवतं.

‘कासव’गतीची लॉन्ग ड्राईव्ह...

हा सिनेमा पाहताना मला सारखी ‘वेळास ट्रीप’ची आठवण होत होती... जवळपास दोन – तीन वर्षांपूर्वी कासवांच्या प्रजातींचं संरक्षण करणाऱ्या एका गावाची माहिती मिळाली होती. दरवर्षी, या गावात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात ‘टर्टल फेस्टिव्हल’ही भरवण्यात येतं... एका विशिष्ट जातीची कासवं इथं दरवर्षी अंडी टाकण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर दाखल होतात... कासवांचं वैशिष्ट्यं म्हणजे, ज्या समुद्र किनाऱ्या वर मादी कासवानं जन्म घेतलाय त्याच किनाऱ्यावर ती आपली अंडी देण्यासाठी ती हजर होते... उत्सुकता म्हणून काही अवलिया मित्रांसोबत हे टर्टल फेस्टिव्हल भरतं त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘वेळास’ या गावाला भेट देण्याचा प्लान बनवला... थोडा हटके म्हणून भर उन्हात बाईकवर वेळासला जायचं ठरलं. लॉन्ग ड्राईव्ह, थोडा ऑफ रोड ड्राईव्ह आणि थोड्या वेळ बोटीवर बाईक लादून प्रवास करता येणार होता. सोबत तीन-चार जण असल्यानं कुणाच्याही बाईकवर ‘पिलन’ म्हणून मागे बसून सहज जाता येणार होतं... अर्थातच त्रास आणि खर्च दोन्ही कमी झालं असतं... पण, मला स्वत:च्या बाईकवर एकटीनं प्रवास करून स्वत:ला पडताळून पाहायचं होतं... घरच्यांकडून आणि मित्रांकडूनही थोडी का-कू झाली पण मला माझीच बाईक घेऊन जायचं होतं... गेले... माझी बाईक ११० सीसी आणि सोबतच्या मित्रांची ५०० सीसीची बुलेट... कसा काय ताळमेळ बसणार? शिवाय वेळही बराच लागणार... नवीनच बाईक घेतली होती... एकटीला बाईकवरून इतक्या लांबवरच्या प्रवासाचा अनुभव नव्हता, त्यामुळे रस्त्यात जर काही अडचणी आल्या तर?  असे बरेच रास्त प्रश्न होते... पण, संपूर्ण प्रवासात मित्रांनी मी कुठेही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली...


समुद्राच्या लाटांना धडकायला तयार झालेलं कासवाचं पिल्लू , वेळास

कासव संवर्धनाचा प्रयत्न

वेळासला पोहचल्यानंतर गावकऱ्यांकडे राहण्याची – जेवण्याची सोय उपलब्ध होती. त्यांच्यासोबत  सायंकाळी समुद्र किनाऱ्यावर जाऊन कासवांच्या दुर्मिळ प्रजातींविषयी थोडी फार माहिती घेतली... कासवाची काही अंडी जपण्यासाठी लावलेल्या जाळ्या, कासवांचा प्रजोत्पादनाचा काळ, प्रजोत्पनाबद्दलच्या काही चमत्कारिक गोष्टीही माहिती करून घेता आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुन्हा समुद्र किनाऱ्यावर पोहचलो तेव्हा अगोदरच्या संध्याकाही पाहिलेल्या अंड्यांतूनच बाहेर पडलेली इवलीशी कासवं समुद्राकडे धाव घेताना दिसली. त्यांच्या चिमुकल्या पायांची मऊसर रेतीवर उमटलेली नक्षी... वेगानं एकमेकांवर आदळणाऱ्या लाटांत आपला निभाव लागणार की नाही? याची पर्वा नसलेली त्या चिमुकल्यांना समुद्राची लागलेली ओढ... आणि निस्वार्थ भावनेने त्यांना जगवणाऱ्या आणि पुन्हा समुद्राच्या हवाली करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या भरून पावलेल्या मुद्रा... साठवून ठेवलेत ते क्षण... कॅमेऱ्यात आणि मनातही...

त्यावेळी, खरं तर केवळ कासवांचं संरक्षण करण्याची धडपड लक्षात आली होती... पण, त्या कासवांच्या जीवनाचा आणि मानवी जीवनाचा, सध्या बदलत चाललेल्या नात्याचा, पारंपरिक कौटुंबिक चौकटीचा एक वेगळा अर्थ ‘कासव’ या सिनेमातून नव्यानं उमजतो, हे मान्य करावं लागेल.

सिनेमाबद्दल...

सिनेमाची कहाणी अगदी सरळ आहे... प्रत्येक पात्राची दृश्यं परिस्थिती कहानीच्या सुरुवातीला जशी आहे तीच परिस्थिती शेवटपर्यंत कायम राहते... बदलतो तो फक्त परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन... तोही आपल्या संपर्कात आलेल्या माणसांमधून... त्यांच्याकडून मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीतून... मध्यमवयीन ‘जानकी’ (इरावती हर्षे) घटस्फोटाच्या धक्क्यानं आलेल्या डिप्रेशनवर उपचार घेतेय... कासवांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘दत्ताभाऊ’ (मोहन आगाशे) यांच्यासोबत कासवांच्या जीवनावर आधारित एका प्रोजेक्टमध्ये तिनं स्वत:ला गुंतवून घेतलंय. अशातच तिला तिच्या मुलाच्या वयाचा जगण्यातला अर्थ हरवलेला ‘मानव’ (आलोक राजवाडे) सापडतो... एसटी स्टँडवर चहा विकणाऱ्या आणि ‘मानलेल्या’ आजोबांना जमेल तशी मदत करणाऱ्या छोट्या ‘परशू’चीही या सिनेमातील भूमिका तितकीच महत्त्वाची आहे.

खरं तर या घटनेचा आणि ‘कासव’ चित्रपटाचा काय संबंध? असा प्रश्न कुणालाही पडेल... या सिनेमात एक सीन आहे... ज्यात ‘मानव’च्या सुरात ओरडण्याला ‘जानकी’ काही शब्द देते... आणि मग त्यातून सुंदर असं संगीत ऐकायला मिळतं... तसंच काहीसं या सिनेमानंही अनुभवांना शब्द दिलेत... ज्यातून हा लेख उमटलाय... असं समजा हवं तर...