इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

Updated: Sep 6, 2015, 07:22 PM IST
इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

ऊसाच्या पिकामुळे दुष्काळ आल्याची आवई जाहीरपणे उठवली जातेय. पण यापेक्षाही काही गोष्टी उशीरा का होईना, तपासण्याची वेळ आली आहे.

सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रात
महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त धरणं आहेत, हे पुन्हा-पुन्हा आठवून सांगितलं जातंय. एका ओळीचं नॉलेज, ग्रामीण महाराष्ट्रावर आरोप करण्यासाठी पुरेसं आहे का?, देशातील सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रात असतील हे मान्य करूया.

पण पाणीपुरवठा शेतीला की शहरांना
मग जरा पुढे माहिती घेण्याचीही तसदी घ्या. कारण या धरणांमधील सर्वात जास्त पाण्याचा वापर शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी होतो, शहरांना पाणीपुरवठा ही सर्वात पहिली तरतूद आहे. त्यानंतर शेती की उद्योग हा प्रश्न आहेच, पाणी उरलं तर शेतीला. यात बिअर कंपन्यांना किती पाणी दिलं जातं हा भाग वेगळा.

शहराच्या पाणी-पुरवठ्यांसाठी पाईपलाईन वाढल्या
मुंबईसह काही मोजक्या शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणं बांधण्यात आली आहेत. मात्र जास्तच जास्त धरणं ही बांधली आणि उभारली जातात, ती शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या नावाखाली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी जातात, मात्र मागील २० ते २५ वर्षात शहरांसाठीच सर्वात जास्त पाईपलाईन्स धरणावर टाकण्यात आल्या. जिल्ह्याचं गाव आणि तालुके यांच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणांवरून भरमसाठ पाईपलाईन्स केल्या.

धरणं शेतीसाठी राहिली नाहीत
पाईपलाईन धरणावरून टाकण्यात अर्थात कुणाचा विरोध नव्हता, कारण प्रश्न पाण्याचा आहे. मात्र शेतीला होणारा पाणीपुरवठा कमी झाला, पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला, तर शेतीला पाणीपुरवठा तसा नसल्यातच जमा, धरणाच्या एक-दोन पाण्याच्या आवर्तनाने कोणतंही पिक येत नाही.

धरणं नको, 'जलयुक्त' प्रामाणिकपणे राबवायला हवी
यावरून धरणं आता शेतीसाठी राहिली नाहीत, म्हणून 'जलयुक्त शिवार'सारख्या योजना प्रामाणिकपणे राबवल्या तरच गाव-खेड्यांचा त्रास कमी होऊ शकतो. कारण यातलं पाणी शहरांना देण्याचा प्रश्न नाही. यातही आमदार-खासदारांच्याच गावात या योजना राबवल्या जाऊ नयेत, तर जास्तच जास्त गावांचा यात समावेश केला जावा हे महत्वाचंय.

शेतीला पाणीपुरवठा झाला, तर पाणीपातळी सुधारते
ज्या वर्षी चांगला पावसाळा झाला, त्या वर्षी शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा अंदाज घेतल्यानंतर  शेतीला पाणीपुरवठा होतो. जेव्हा धरणातून शेतीला पाणीपुरवठा होतो, तेव्हा पाटातून पाणी फिरतं, धरणापासून दीडशे दोनशे किलोमीटर दूरपर्यंत हे पाणी पुरवलं जातं, तेव्हा पाटाच्या पाण्यातून पाणी जमिनीत मुरतं, याचा फायदा जमिनीतील पाणीपातळी सुधारण्यास होतो, मात्र महाराष्ट्रातील काही भाग सोडला, तर धरणातून शेतीला पाणीपुरवठा आता कमी होत चालला आहे, काही पाण्याच्या पाटांमध्ये पाच-पाच वर्ष पाणी फिरलेलंच नाही. यामुळे जमिनीतली पाणीपातळी कमालीची खाली गेलीय.

शेतीला पाणीपुरवठ्याने ग्रामीणांचा पाणी प्रश्न सुटतो
धरणांवर शहरांना पाणीपुरवठा करण्याचा ताण वाढलाय, त्यामुळे धरणातून शेतीला पाणीपुरवठा करणे, ही बाब दुरावत चालली आहे, धरणातून जेव्हा शेतीला पाणीपुरवठा होतो, तेव्हा गावातील तलाव, नाल्यातही पाणी येतं पर्यायाने ग्रामीण महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटत असतो.

इंडियाने पाणी घेतल्याने भारताचं पाणी नाही
मात्र इंडियातील लोकांनी भारतातील धरणांवरून पाईपलाईन्स केल्याने, भारताच्या हक्काचं पाणी देखील आता हिरावलं गेलंय, शहरातील बांधकामांमुळे नद्यांचा वाळू उपसा वाढलाय, यामुळे देखील पाणी पातळी खाली जात आहे, त्यामुळे भारतातील लोकांवर इंडियाच्या लोकांनी गप्पाचे फड रंगवत टीका करणे किती योग्य आहे, हा विचार होणे गरजेचे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.