चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?

चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.

Updated: Oct 29, 2016, 04:50 PM IST
चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा? title=

ब्रिगेडियर हेमंत महाजन :

चीनचे आर्थिक आक्रमण थांबवून 'मेक इन इंडिया’ला चालना देणे जरुरी

चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत. भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर आणि चीन करत असलेल्या भारतविरोधी कारवायांच्या पाश्वभूमीवर भारतात चीनविरोधी भावना निर्माण झाली असून त्यातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार सुरू झाला आहे.

या मोहिमेमुळे चीनचे पित्त खवळले असून प्रस्तुत ग्लोबल टाईम्सच्या स्तंभांमधून भारताच्या नावे कडाकडा बोटे मोडली गेली आहेत. ‘भारत केवळ भुंकू शकतो, करु काहीही शकत नाही, तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे, पैसे आहेत, पण ते सारे भ्रष्टाचारी लोकांनी दडवून ठेवले आहेत, (हे खरे आहे ) वीज- पाणी यांचा पत्ता नाही.

नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे स्वप्न म्हणूनच अव्यहार्य आहे. चीनी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार चुकून देखील करु नये. यासारखी प्रचंड आदळआपट या चीनी माध्यमाने केली आहे.

येत्या दिवाळीत बाजारात उपलब्ध होणार्‍या चीनी वस्तू नाकारत आपल्या देशातल्या लोकांनी तयार केलेला माल विकत घ्या एवढे आवाहनच केले तर चीनला हादरायची वेळ आली. आमचा देश ‘मेक इन इंडिया’ची भाषा बोलू लागला तर चीन त्याची खिल्ली उडवत आहे. ती घोषणा कशी फसवी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

कारण त्यांनी त्यांचे तंत्रज्ञान वापरून त्यांच्या माणसांच्या मदतीने, त्यांच्या देशात तयार केलेली उत्पादने, मोजल्या गेलेल्या पैशाच्या मोबदल्यात आम्हाला देण्याची सध्याची रीत ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेत बाद ठरणार आहे.

इथून पुढे त्यांना त्यांचा कारखाना भारतात उभारावा लागेल. त्यांचे तंत्रज्ञान घेऊन इथे यावे लागेल. त्या प्रक्रियेत सहभागी होणारी माणसं आमची असतील. मग का नाही खिल्ली उडवणार चीन आमच्या कल्पनेची?

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, यासाठी सातत्याने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा प्रभाव आता दिसू लागला आहे. चीनी वस्तूंच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.

भारतातले चीनी समर्थक

चीन पॉप्यूलर ब्रॅंडसचे बनावट अथवा देशी ब्रॅंडस बनविण्यात माहिर आहे. अॅप्पलच्या आयफोन स्टोअर्सपासून ते स्टारबक्स कॉफी हाऊसपर्यंत चीनने सर्व ब्रॅंडस देशी स्वरूपात बनवले आहेत. येथे फेमस ब्रॅंड्सच्या बनावट स्टोअर्स आणि प्रॉडक्सचा व्यवसाय चीनमध्ये जोरात चालतो.

कमी दर, मोठ्या प्रमाणातील सहज उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे चीनी वस्तूंची मोठ्या प्रमाणातील मागणी भारतात आहे. कमी दरात चैनीच्या वस्तू उपलब्ध होत असल्याने त्याला मागणीही भरपूर आहे. कमी दरातील उत्तमोत्तम वस्तू विकत घेण्याच्या ग्राहकांच्या हक्कांबाबत बोलणारे लोकही कमी नाहीत.

काही लोकांकडून चीनच्या विरोधातली भाषा बोलणार्‍यांच्या विरोधात कंबर कसून उभे राहण्याच्या नादात आता चीनी वस्तू विकणार्‍यांचे कसे होईल या चिंतेचा भावनिक व्यापार मांडला जाऊ लागला आहे.

रोजगार नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागत

चीन आम्हाला देतो ते ‘प्रॉडक्ट’ असते ‘टेक्नॉलॉजी’नाही. तंत्रज्ञान तो देश आम्हाला देणारही नाही, कारण त्याला प्रॉडक्ट विकण्यात स्वारस्य आहे. इतक्या वर्षांत संगणकाचे सुटे भाग तयार करण्याचे तंत्रज्ञान आम्ही स्वत: विकसित करू शकलो नाही किंवा दुसर्‍या कुठल्या देशाकडून ते घेण्याची गरजही आम्हाला वाटली नाही. हा आमच्या देशातल्या कालपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावाचा दोष आहे.

चीनी स्मार्ट फोनची निर्माती जगातील तिसरी मोठी कंपनी वावोने गेल्या महिन्यातच आपले उत्पादन केंद्र भारतात सुरू केले. चीनी जिओनी, शिओमी या अन्य निर्मात्यांनीही भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसादाचा मानस जाहीर केला आहे. चीनी मायक्रोमॅक्सने तिच्या फोनसाठी कच्चा माल चीनमधून आयात होत असला तरी येथे जुळणी करून तयार होणारी उत्पादने भारताच्या बाजारातील विक्रीसह रशियाला निर्यातही होतात.

भारतात उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आणि नागपुरात सुरू होणारा चीनच्या कंपनीचा रेल्वे डबेनिर्मिती कारखाना आणि चीनी बस्तूंवर बहिष्कार या दोन वेगवेगळ्या बाबीं आहेत.

कारखान्यामुळे नवीन तंत्रज्ञान देशात येत असेल व त्यामुळे रोजगार उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, पण ज्या वस्तू भारतात निर्माण होतात, पण केवळ स्वस्त आहे म्हणून विदेशी वस्तूंची विक्री होत असेल व त्यामुळे भारतीय कारखाने बंद पडत असतील तर त्याचा रोजगाराला फटका बसतो. चीनी बनावटीच्या वस्तूंना असलेला विरोध यामुळेच आहे.

घुसखोरी नव्हे आक्रमणच

भारतातील अनेक अभ्यासक, जॉर्ज फर्नांडिसांसारखे अभ्यासू संरक्षणमंत्री चीनला पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू मानायचे. चीनची घराघरातील वस्तू रूपातली आर्थिक घुसखोरी पाहता ते खरेही होते, आजही आहे. ही चीनी घुसखोरी नव्हे आक्रमण थांबायलाच हवे हे अनेक अभ्यासकांना काही वर्षांपासून वाटायला लागले आहे.

चीनी वस्तूंनी ‘आपल्या घरात केलेले घर’ अनेकांना अस्वस्थ करून टाकत आहे. ‘चीनी वस्तूंवर बहिष्कार’ अशा स्वरूपाची आंदोलने अनेक आघाड्यांवर केली जाऊ लागली आहेत. पण चीनी अर्थसल्लागारही काही स्वस्थ बसणार नाहीत. भारतासारखी मोठ्ठी आणि सहज उपलब्ध झालेली बाजारपेठ सहजासहजी ते सोडणार नाहीत.

चीनच्या औद्योगिक धोरणाने भारतातील उद्योगांवर केलेले हे आक्रमणच भयंकर आहे. चीनची ताकद वाढणे आपल्यासाठी घातकच आहे. ही बाब अनेकांना विविध क्षेत्रांत काम करणार्‍यांना आता कळली आहे. अनेक स्थानांवरून चीनी आक्रमण थोपविले जात आहे. यश मिळताना दिसते आहे. ते वाढावे चीनी वस्तूंचे आपल्या जीवनातून उच्चाटन व्हावे अशीच इच्छा कोणत्याही भारतीय माणसाची असणार आहे.

चीनला गरज भारताची

चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अधिक निर्भर आहे. या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६० टक्के  हिस्सा हा निर्यातीचा आहे. त्यातही भारताचा वाटा एकूण आशियाई देशांमध्ये अधिक आहे. चीनमध्ये तयार केलेल्या मोबाइल, लॅपटॉप, खते, दूरसंचार क्षेत्रातील विविध साहित्य अशा छोट्या वस्तूंची येथील बाजारपेठ मोठी आहे.

भारत हा चीनला कापड, तेल पदार्थ, मशीन आदी वस्तू निर्यात करत असला तरी चलनात हे प्रमाण कमी पडते. व्यापाराच्या दृष्टीने भारत-चीन हे जगातील एक मोठे भागीदार देश आहेत. हाँगकाँग, शांघाय अशी व्यापारउदिमात आयकॉन असलेली शहरे सागरी किनाऱ्यालगतची आहेत. परिणामी या देशाचा सागरी व्यापारही अधिक आहे. पर्यटन, सी फूड्स याद्वारे या देशाचे स्वत:चे पोट तर भरतेच शिवाय निर्यातीसारखा मोठा आणि तेही विदेशी चलनातील उत्पन्न स्रोत या देशाला लाभला आहे.

भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज

चीनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात. चीनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. चीनी उद्योगांनी मानवी हातांचा व योग्य वापर करून त्यांची उत्पादने इतकी स्वस्त करून टाकली आहेत की मोठमोठे भारतीय उद्योजक चीनी उत्पादकांच्या दरात त्या वस्तूंचे उत्पादन करूच शकत नाहीत.

कारखाने टाकण्यापेक्षा चीनवरून आयात केलेल्या मालाला आपले फक्त लेबल लावून विकणेच फायदेशीर ठरू शकते. आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे. चीनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चीनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगल करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चीनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत.

आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे, सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाण लघुउद्योग निर्माण करायाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे.

कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग   उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. सर्वांना विनंती आहे की कोणतीही चीनी बनावटीची MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका. व्यापारी मित्रांनी  पण  चीनी माल स्वस्त मिळतोय म्हणुन खरेदी अथवा विक्री करू नका. कारण आपल्याला चीनला आणि पर्यायाने पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची एक संधी आहे.