दीपक भातुसे, मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून चर्चा सुरू झाली खरी पण भाजपने या चर्चेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली असून शिवसेना या व्यूहरचनेत अडकल्याचे चित्र आहे. शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले. मात्र हे संकेत देताना त्यांनी कधी नव्हे तो “पारदर्शक अजेंडा” हा शब्द समोर आणला. कुठल्याही पक्षांची युती अथवा आघाडीची चर्चा होते ती जागा वाटपावरून आणि असला मुद्दा तर तो किमान समान कार्यक्रमाचा असतो. या किमान समान कार्यक्रमामध्ये निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरं जायचं, जनतेला कोणती आश्वासने द्यायची अथवा सत्ता आल्यानंतर कोणती कामे करायची याचा प्रामुख्याने असला तर समावेश असतो. पण भाजपाने कधी नव्हे ते युती करताना पहिली अट टाकली आहे ती पारदर्शक अजेंड्याची. ही अट टाकूनच भाजपाने शिवसेनेची मोठी कोंडी केली आहे. प्रथमतः पारदर्शक अजेंडा म्हणजे काय याची फोड भाजपाने केलेली नाही. शिवसेनेनेही पारदर्शक अजेंडेचा वेगळा अर्थ काय असा सवाल उपस्थित केल्याने भाजपाने शिवसेनेसमोरही त्याची फोड केलेली दिसत नाही.
मात्र भाजपला अपेक्षित पारदर्शक अजेंडा म्हणजे मुंबई महापालिकेतील पारदर्शक, स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हा आहे. म्हणजेच आतापर्यंत मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सत्तेत पारदर्शक, स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार नव्हता हे यातून भाजपला दाखवून द्यायचे आहे. तसे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर मागील वर्षभर भाजपकडून जेवढी टीका होतेय, तेवढी महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही केलेली नाही. म्हणजेच महापालिकेतील विरोधी पक्ष आपली भूमिका पार पाडायला अपयशी ठरले आहेत हे खरे आहे, पण त्यापेक्षा भाजपाला शिवसेनेला उघडे पाडायचे आहे, शिवसेना किती भ्रष्ट पक्ष आहे हे भाजपाला मुंबईकरांसमोर आणायचे आहे. शिवसेना मुंबईत बदनाम झाली की मुंबईत निवडून येण्याचा आपला मार्ग मोकळा होईल असा विश्वास भाजपाला आहे. त्यामुळेच विरोधी पक्षापेक्षा भाजपानेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी वर्षभरापासून शिवसेनेविरोधात मोहीम सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत केवळ शिवसेना एकटी सत्तेवर नाही, तर मागील 20 वर्ष शिवसेनेबरोबर भाजपाही इथे सत्तेत वाटेकरी आहे. असे असताना आपण मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत आहोत हे विसरून भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करणे सुरू केले. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यात आघाडीवर होते. एकीकडे शिवसेनेला बदनाम करण्याची भाजपाची मोहीम युतीची चर्चा सुरू होऊनही चालू आहे.
पारदर्शक अजेंड्याबरोबर भाजपाने जागा वाटपाचा आपला फॉर्म्युला शिवसेनेसमोर ठेवला असून त्यांनी 114 जागांवर दावा केला आहे. मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत यातील 114 जागांवर भाजपाने दावा सांगितल्याने सहाजिकच शिवसेनेने 113 जागा घ्याव्यात अशी भाजपाची भूमिका आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये भाजपाने केवळ 64 जागा लढवल्या होत्या. आता भाजपा थेट शिवसेनेपेक्षा एका जास्त जागेची मागणी करत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास कधी नव्हे तो वाढला आहे आणि या वाढलेल्या आत्मविश्वासामुळेच भाजपा आता शिवसेनेबरोबर पूर्वीचे संबंध विसरला असून राजकारणातील सर्व पत्ते आपल्या हातात असले पाहिजेत या भावनेतून वावरत आहे. भाजपा नेत्यांची ही भावना सहाजिकच आहे. कारण विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपाचे 15 आमदार, तर शिवसेनेचे भाजपापेक्षा एक कमी म्हणजे 14 आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 115 वॉर्डमध्ये भाजपाल आघाडी मिळालेली आहे. त्यामुळेच मुंबईतील वाढलेली ताकद लक्षात घेता भाजपाने शिवसेनेसमोर 114 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेना हा प्रस्ताव मान्य करणार नाही. पण शिवसेनाही भाजपाचा किती जागा सोडायला तयार होणार हाही खरा प्रश्न आहे. सध्या मुंबईत महापालिकेत शिवसेनेचे 85 नगरसेवक आहेत. त्यामुळे या जागा शिवसेना सोडण्याची शक्यता नाही. तरीही यातील काही वॉर्डवरही भाजपा दावा सांगण्याची शक्यताही आहे. त्यामुळे जागा वाटपातही शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपा युतीत शेवटपर्यंत जागावाटपाची चर्चा सुरू राहील आणि शेवटच्या क्षणी युती तोडण्याची घोषणा भाजपातर्फे एकनाथ खडसे यांनी केली. आता मुंबई महापालिकेतील युती तोडण्याबाबतची घोषणा करणारे एकनाथ खडसे कोण असतील अशी चर्चा सध्या मुंबईतील राजकारणात सुरू आहे.
मुंबई महापालिकेबरोबरच राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना-भाजपा एकत्र आहेत राज्यातील सत्तेत शिवसेनेचा वाटा कमी आहे. सत्तेत वाटा देताना इथे आपल्या अटींवर भाजपाने शिवसेनेला सत्तेत वाटा दिला. तसेच त्यापुढेही जिथे संधी मिळेल तिथे मुख्यमंत्री आणि भाजपाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. दुखावलेली शिवसेना त्यामुळे सत्तेत सहभागी असूनही विरोधी पक्षाप्रमाणे सरकारवरच टीका करत आहे. ही टीका आजही सुरू आहेच. एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या या दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे दुरावले आहेत. मात्र तरीही सत्तेमुळे दोघेही वेगळे होण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा, कचरा घोटाळा, टॅब घोटाळा अशा विविध घोटाळ्यावरून एकीकडे भाजपाने शिवसेनेला आधीच बदनाम केले आहे. भाजपाच्या मते शिवसेना भ्रष्ट पक्ष आहे तरी त्या पक्षाबरोबर भाजपाने युतीची चर्चा सुरू केली आहे आणि तोच पक्ष भाजपाबरोबर राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये सत्तेत एकत्र आहे. त्यामुळे भाजपालाही या सगळ्यात केवळ राजकारण करायचे आहे हे उघड आहे. मुंबईकरांना अशा प्रकारे बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.
राज्यात भाजपाची सत्ता येऊन आता सव्वा दोन वर्ष झाली आहेत. या सव्वा दोन वर्षात पुलाखालुन बरेच पाणी गेले आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलो तर त्याचा फटका बसेल अशी काहीशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून युतीबाबत सुरुवातीपासून सकारात्मकता दाखवली जात आहे. मात्र युती झाली तर ती भाजपाच्या अटीवर झाली पाहिजे आणि त्यातही शिवसेनेला जितके बदनाम करता येईल तितके बदनाम करायचे आणि त्यांची मुंबईतील ताकद कमी करायची असा गनिमी कावा भाजपाने आखला आहे. शिवसेनेला सध्या तरी हा गनिमी कावा लक्षात आलेला दिसत नाही. त्यामुळे पारदर्शक अजेंड्याचा मुद्दा युतीत प्रमुख मुद्दा असेल असे जाहीर केल्यानंतरही शिवसेना भाजपाबरोबर युतीच्या चर्चेसाठी तयारी झाली. आता ही युतीची चर्चा यशस्वी झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावर युती झाल्याचा ढोल भाजपाकडून पिटला जाईल आणि यापूर्वी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत पारदर्शकता नव्हती हे अधोरिखेत होती. दुसऱ्या बाजूला युती झाली नाही तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावर शिवसेना युती करायला तयार नसल्याचा ढोल भाजपाकडून पिटला जाईल आणि आधीच भाजपाच्या नेत्यांनी सुरू केलेली शिवसेनेची बदनामी आणखी जोरात केली जाईल. यात प्रामुख्याने शिवसेनेविरोधातील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख असेल. त्यामुळे शिवसेना-भाजपामध्ये युतीत तह झाला अथवा झाला नाही तरी त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. चाणक्ष मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे पारदर्शक अजेंडा हा गोंडस शब्द पुढे करून शिवसेनेची पुरती कोंडी केली आहे.