www.24taas.com, मुंबई
मुंबई उपनरीय रेल्वे वाहतूकीचा चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प म्हणून एमयूटीपी प्रकल्प ओळखला जातो. ‘एमयूटीपी-एक’ पूर्ण झालाय आणि ‘एमयूटीपी-दोन’चं काम सुरु आहे. मात्र, जोपर्यंत ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाही.
मुंबई शहर, उपनगर आणि परिसरात लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतेय. सहाजिकच त्याचा ताण लोकल सेवेवर पडतोय. ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद झाली तरच भविष्यात मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे. ‘एमयुटीपी-तीन’मध्ये हार्बर मार्गावर सीएसटी-पनवेल असा जलद मार्ग प्रस्तावित आहे. विरार-वसई-पनवेल या मार्गावर लोकल सेवेचा प्रस्ताव आहे. हार्बरची लोकल बोरीवलीपर्यंत नेणं, विरार-डहाणू मध्ये तिसरी-चौथी रेल्वे लाईन प्रस्तावित, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे डहाणू, पनवेल, कर्जत, कसारा मार्गावर भविष्यात वाढणारी गर्दी सामावून घेण्याची क्षमता उपनगरीय रेल्वेला मिळणार आहे.
‘एमयूटीपी-दोन’ची कामं सुरु असली तरी ती युद्धपातळीवर पूर्ण होणं अपेक्षित आहे. यामध्ये ७२ नवीन लोकल दाखल होणार आहेत. त्यांचा अजून पत्ता नाही. तसंच ठाणे-सीएसटी मार्गाचं जीसी ते एसी असं विद्युतपरिवर्तन झालं तर तेही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.