अंकुश चौधरी
गूढकथा... एक वेगळाच प्रकार. एक वेगळाच अनुभव... काहीसा अद्भुत, घाबरवणारा.. पण, तरीही आवडणारा. आपल्याला भीतीचंही आकर्षण कसं काय असू शकतं? पण, तसं असतं खरं. म्हणून तर भुता-खेताच्या गोष्टी ऐकाव्याशा वाटत असतात ना.. भलेही त्यावर विश्वास असो वा नसो... कारण, त्यात एक गंमत असते. उत्सुकता असते.
मलाही सध्या अशी उत्सुकता लागून राहिली आहे. कारण, उद्या माझी फिल्म ‘प्रतिबिंब’ तुम्हा सर्व प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि प्रतिबिंब हा थरारपट आहे... गूढरम्य कथा असलेला. अशा पद्धतीचा चित्रपट मी यापूर्वी कधीच केला नव्हता. माझे बरेचसे चित्रपट हे विनोदी आहेत. काही कौटुंबिक, काही हार्ड हिटींग तर काही रॉम-कॉमसुद्धा मी केलेत.. पण, सस्पेंस थ्रिलर...तो पण, इतक्या वेगळ्या स्टाईलचा... मला सॉलीड एक्साईटमेंट आहे याबद्दल. जशी एकांकिका किंवा नाटकाचा पहिला प्रयोग सुरू होण्यापूर्वी विंगेत उभं राहिल्यावर वाटत असतं ना, तसं वाटतंय अगदी. पण, नाटक ते नाटक, सिनेमा तो सिनेमा...
नाटकाची नशाच वेगळी असते. ती ऊर्जा, ते वातावरण, तो लाईव्ह परफॉर्मन्स आणि तो इन्स्टंट रिस्पॉन्स... त्याची जादूच वेगळी.. त्या गोष्टी सिनेमा करताना नसतात. पण, ऊर्मी तीच असते. म्हणून मला सिनेमात काम करायला मजा येते.. खरं सांगायचं तर, मला स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहायला खूप आवडतं. आणि त्यातून तो सिनेमा प्रतिबिंबसारखा असेल तर क्या बात है! प्रतिबिंबचं शुटींग कल्याणजवळच्या विक्रमगड उथल्या राजवाड्यात झालंय. हे लोकेशनच खूप वेगळं होतं. खूप रिच वाटत होतं. आणि हा सिनेमा पाहाताना तुम्हालाही अगदी तसाच श्रीमंती अनुभव येईल, हे नक्की.
या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण म्हणजे मी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, लोकेश गुप्ते २०-२२ दिवस एकत्र रहात होतो. त्यातून आमच्यात एक वेगळं बाँडिंग निर्माण झालं. आम्ही आधी जितके होतो त्याहूनही जास्त जवळचे मित्र बनलो. आणि यातून आमची केमिस्ट्रीही खूप छान डेव्हलप झाली. त्याचा प्रत्यय प्रतिबिंब बघताना तुम्हाला येईलच. तुम्हालाही ते जाणवेल.
मराठी सिनेमा खरंच किती वेगवेगळे विषय हाताळतोय. प्रतिबिंबही एक वेगळ्याच स्टाईलचा सिनेमा आहे. तो तुम्ही सर्वांनी नक्की पाहा. आणि कसा वाटला तुम्हाला ते आठवणीने सांगा मला. मी वाट पाहातोय. बाय.
शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर