www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बकरी ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘बॉस’ आज रिलीज झालाय. मल्याळम सिनेमा ‘पोक्किरी राजा’चा ‘बॉस’ हा रिमेक असल्याचं आपल्याला माहितीच आहे. पण सिनेमा बघतांना ‘बॉस’ हा राऊडी राठोड, खिलाडी 786 पासून ‘दबंग’पर्यंत सर्वच चित्रपटांचं रिमिक्स असल्याचं जाणवतं. असं असलं तरी मसालायुक्त तडक्यानं बॉस सर्वांचं मनोरंजन करतो.
फक्त ‘बॉस’ पाहायला जातांना तुम्ही फार काही अपेक्षा न करता, केवळ हसण्यासाठी चित्रपट बघायचाय हे लक्षात ठेवून गेल्यास, तुमचा विरस होणार नाही.
सिनेमाची स्टोरी –
बॉसमध्येही अक्षय कुमार आपल्या इतर सिनेमांसारखा स्टंट करतांना दिसणार आहे. शाळेतील शिक्षक ज्याचा रोल केलाय अभिनेता मिथून चक्रवर्तीनं.. मिथूनचा हा मुलगा सूर्या (अक्षय कुमार). वडिलांचा अपमान केल्याच्या कारणानं लहानपणीच सूर्या एका मुलाचा खून करतो. त्याची तो शिक्षाही भोगतो. अर्थातच आदर्शवादी शिक्षक आपल्या मुलाला घरातून हाकलवून लावतात.
लहानपणीच घरातून बाहेर पडलेला सूर्या मग ट्रान्सपोर्ट माफिया असलेल्या ताऊजीचा (डॅनी) जीव वाचवतो आणि त्याचा मुलगाच बनतो. हे ताऊजीच सूर्याचं ‘बॉस’ असं नामकरण करतात.
एकीकडे सूर्याचा बॉस होतो. तर दुसरीकडे त्याचा भाऊ शिव पंडित हा एसीपी आयुषमान ठाकूरच्या (रोनित रॉय) बहिणीच्या प्रेमात पडतो. मग तिच कथा एसीपीला आपल्या बहिणीचं लग्न करायचं असतं एका मंत्र्याच्या मुलासोबत... मग काय एसीपी शिव पंडितवर खोटा आरोप लावून त्याची रवानगी तुरुंगात करतो. बरं एवढं होईपर्यंत सूर्याला शिव पंडित आपला भाऊ असल्याचं माहित नसतं. जेव्हा सूर्या उर्फ बॉसला हे माहित होतं. तेव्हा तो शिव पंडितला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अखेर होते बॉस आणि एसीपीची फायटिंग आणि नेहमीप्रमाणेच विजयी होतो चित्रपटाचा हिरो ‘बॉस’...
काय आहे सिनेमात?
ही स्टोरी वाचून तुम्हाला काही नवखं जाणवणार नाही. सिनेमाची सुरूवात स्लो असून सेंकड हाफ फास्ट जातो. सिनेमातली अक्षय कुमारची एँट्री तब्बल अर्ध्या तासानंतर आहे. तोपर्यंत शिव पंडित आणि अदिती राव हैदरींची प्रेमकहानी दाखवलिय. त्यांच्यावर एक गाणंही चित्रित झालंय.
सिनेमात अक्षय कुमार हरियाणवी बोलतांना दिसतो. त्याची सिनेमातली एँट्रीही अतिशय विनोदी पद्धतीनं आहे, अर्थात बॉसची एँट्री ही फायटिंग करतांनाच आहे. पण तीही विनोदी... त्यामुळं हा सिनेमा बघतांना, त्यातले स्टंट बघतांना तुमचं हसून-हसून पोट दुखेल. अक्षय कुमार बॅलॅन्स्ड रोल करतांना दिसतो.
अभिनेता रोनित रॉयनं खलनायकाची भूमिका खूप चांगली निभावलीय. अक्षयच्या भावाचा रोल करणारा शिव पंडित न्यू-कमर असला तरी आपली चांगली छाप सोडून जातो. अक्षयचा हा असा सिनेमा आहे की त्यात त्याला हिरोईनच नाही. सोनाक्षी सिन्हा आहे पण तीही गाण्यांपुरतीच. सिनेमात अक्षय आणि सोनाक्षीचे दोन गाणे आहेत.
सिनेमाचं दिग्दर्शन एँटनी डिसूजानं केलंय. ज्यानं ‘ब्लू’सारखा अयशस्वी सिनेमा दिला होता. मल्याळम सिनेमा ‘पोक्किरी राजा’चा रिमेक असलेल्या ‘बॉस’चं मूळ साहित्य घेऊन लेखक साजिद-फरहादनं पूर्णपणे खळबळजनक घटना आणि विनोदी संवाद लिहिले आहेत. हे डायलॉग म्हणजे पोकळ गर्जना युक्त भाषण नसून मजेशीर संवाद आहेत.
सिनेमातला प्रत्येक सिक्वेन्स हा नाविन्यपूर्ण आहे. अक्षयचे स्टंटही नेहमीप्रमाणंच आहेत. सिनेमामध्ये लक्षात राहण्याराहण्यासारखं आहे त्याचं म्युझिक. सिनेमाचं संगीत हे स्पीकरबाहेर येणारं आणि प्रत्येकाला डांस करायला लावणारं आहे.
एकूणच लाईट वेटेड असा हा सिनेमा निव्वळ मनोरंजनासाठी बनवलेला विनोदी सिनेमा आहे, असं म्हणायला हरकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.