www.24taas.com, मुंबई
आपल्या अप्रतिम सौंदर्यामुळे ऐश्वर्या राय १९९४ साली मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड किताबाची मानकरी ठरली होती. यानंतर १९९७ साली तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. तामिळ सिनेमा ‘इरुवर’ मधून तिने आपल्या अभिनय प्रवासाला सुरूवात केली. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता.
ऐश्वर्याचा जन्म १९७३ साली कर्नाटकातल्या मंगळूर येथे झाला होता. आज ऐश्वर्या ३९ वर्षांची झाली आहे. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खास आहे, कारण यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी ‘आराध्या’ हीदेखील आहे. २००७ साली ऐश्वर्याचा बॉलिवूडचा शहेनशाँह अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी झाला होता. २०११ साली तिची मुलगी ‘आराध्या’ हिचा जन्म झाला.
ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये आपलं बस्तना चांगलंच बसवलं आहे. सध्याच्या टॉपच्या नायिकांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. आपल्या डोळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ऐश्वर्याने सिनेमान आपण अभिनयही करू शकतो, हे दाखवून दिलं. लग्नापूर्वीपर्यंत ती बॉलिवूडच्या अतयंत महागड्या अभिनेत्रींपैकी एक होती. ऐश्वर्याने बॉलिवूडच्या बहुतेक प्रत्येक नामी अभिनेत्यासोबत काम केलं आहे.
ऐश्वर्याने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच हॉलिवूडडमध्येही तिने काम केलं आहे. ‘ब्राइड अँड प्रेज्युडाइज’ या सिनेमातून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१० साली दक्षइणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत तिने केलेला ‘रोबोट’ हा सिनेमा तुफान यशस्वी झाला होता. हम दिल दे चुके सनम, देवदास या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही मिळालं होतं.
आज ऐश्वर्या भारतातल्या सर्वांत श्रीमंत महिलांपैकी एक गणली जाते. ऐश्वर्याशी संबंधित जगभरात १७००० इंटरनेट वेबसाइट्स आहेत. २००४ साली ‘टाइम’ मासिकामध्ये जगातल्या सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत तिचं नाव होतं.