www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ उर्दू साहित्यकार आणि गीतकार निदा फाजली यांनी चक्क अमिताभ बच्चन यांची तुलना मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल आमिर कसाबशी केलीय. त्यांच्या मते, दोघेही दुसऱ्यानंच घडवलेल्या हातातली खेळणी आहेत.
एका साहित्यिक पत्रिकेला लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. अँग्री यंग मॅनचा खिताब केवळ ७० च्या दशकापर्यंतच कसा काय सीमित केला जाऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. ‘माझ्या मते ७० च्या दशकापेक्षा रागाचा पारा चढण्याची खरी गरज आजच्या युगात आहे आणि मग, अमिताभला अँग्री यंग मॅनच्या किताबानं कसं काय गौरविलं गेलं? अमिताभ तर अजमल आमिर कसाबसारखंच एक खेळणं आहे... कसाबला हाफिज सईदनं बनविलं होतं आणि अमिताभला सलीम जावेदनं... एका खेळण्याला फाशी दिली गेलीय पण त्याला बनवणारा मात्र पाकिस्तानात त्याच्या नावाचा उघडउघडपणे नमाज पढतोय. दुसऱ्या खेळण्याचीही खूप प्रशंसा होतेय. पण त्याला बनविणारा मात्र विसरणीत गेलाय’, असं फाजली यांनी म्हटलंय.
फाजली यांच्या या तुलनेनं साहित्यिक जगात एकच खळबळ उडवून दिलीय. कवि आणि विचारवंत समजले जाणारे असद जैदी फाजली यांनीही निदा फाजलींच्या या वक्तव्याची री ओढलीय. निदा फाजलींनी कसाब आणि अमिताभ या दोघांदरम्यान ओढलेली समांतर रेषा योग्यच आहे, असं त्यांनी म्हटलंय.
सत्तरच्या दशकात हिंसक प्रवृत्तीला चालना देण्याऱ्या अनेक भूमिका अमिताभनं पडद्यावर उभ्या केल्या होत्या. त्या न्यायव्यवस्थेच्या विरुद्ध चालणाऱ्या होत्या... आणि त्यालाच नायक म्हणून दर्शकांसमोर सादर केलं गेलं. यातील बऱ्याचशा व्यक्तिरेखांना सलीम-जावेद या जोडीनं मूर्त रूप दिलं होतं.