बिग बी अमिताभचे ७१ व्या वर्षात पदार्पण

बॉलिवूडचा शहंशाह. अँग्री यंग मॅन. स्टार ऑफ द मिलेनिअम अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन. आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत, जीवतोड मेहनत करुन बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपलं स्टारडम जपलं. बॉलिवूडच्या या शहंशाहने ७१ व्या वर्षात पदार्पण केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2013, 09:34 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा शहंशाह. अँग्री यंग मॅन. स्टार ऑफ द मिलेनिअम अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन. आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत, जीवतोड मेहनत करुन बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपलं स्टारडम जपलं. बॉलिवूडच्या या शहंशाहने ७१ व्या वर्षात पदार्पण केलंय.
१८४२ साली याच दिवशी जन्माला आला एक महानायक.. हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांचा पुत्र अमिताभ बच्चन.. पित्याकडून आलेली साहित्याची आवड आणि आईकडून मिळालेली रंगभूमीची जाण याच्या जोरावर अमिताभ यांनी मुंबईची वाट धरली. राजेश खन्ना यांच्या काळात अमिताभना सिनेसृष्टीत जम बसवायला वेळ लागला. भुवन शॉ, सात हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट.
सात हिंदुस्तानी चित्रपटानं त्यांना पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं, आणि त्यानंतर अमिताभ यांनी मागे वळून पाहिलं नाही.. बॉम्बे टू गोवा, आनंद या सिनेमांमधून अमिताभ यांनी आपल्या कामाची दखल घ्यायलाच लावली.. ७०च्या दशकात देशात बदलाचं वारं वाहू लागलं.. आणीबाणीमुळे व्यवस्थेविरुद्ध भावना जनतेच्या मनात पेटत असतानाच अमिताभ नावाच्या झंझावातानं जनतेला दिला अँग्री यंग मॅन.
जंजीर, कुली, लावरिस, त्रिशूल, खून-पसीना, कालिया, अग्नीपथ, काला पथ्थर, डॉन या सगळ्या सिनेमांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचं चित्रण झालं. त्यामुळे अमिताभ हिंदी सिनेमातल्य एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. चुपके-चुपके, नमक-हलाल, मिलीसारखे वेगळे सिनेमाही त्यांनी केले. तर सिलसिला, कभी-कभी, मुकद्दर का सिकंदर अशा सिनेमांमधून प्रेमाची नवी परिभाषाच अमिताभने बॉलिवूडला दिली.
चाळीशीनंतर अमिताभनी राजकारणाची चवही चाखली. मात्र, त्यांचा हा निर्णय साफ चुकला. बॉलिवूडच्या दुस-या इनिंगमध्ये अमिताभ यांनी मेजर साब, अक्स, सरकार, एकलव्य, मोहब्बते, बागबान असे चित्रपट केले.. तर होम प्रॉडक्शनच्या पा या सिनेमानं नवा इतिहास रचला.. आणि अभिनयातही आपण सगळ्यांचेच पा असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं. `पा`मधल्या भूमिकेनं त्यांना आणखी एक नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं.
आजही बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणत वयाच्या ७१ व्या वर्षींही अमिताभ यांची वाटचाल सुरुच आहे. सिनेमातूनच नाही तर एक उत्तम सूत्रधार म्हणून ते घराघरातल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले ते कौन बनेगा करोडपती या शोमधून. जीवंत अभिनय, बुलंद आवाज, धडाकेबाज अँक्शन, सहज सोपी नृत्यशैली, हटके लूक आणि कामाच्या शिस्तीने बनलेलं रसायन म्हणजे अमिताभ. मग याला शहंशाह म्हणा. सुपरस्टार म्हणा. किंवा वन मॅन इंडस्ट्री म्हणा. गेली ४० वर्ष याच महानायकानं आपल्या सगळ्याच्यावर मोहिनी घातलीय. आणि ही मोहिनी अशीच कायम राहो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.