आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही - अंतरा माळी

प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अभिनेत्री अंतरा माळी हिनं अखेर आपलं मौनव्रत सोडलंय. अंतराची वडील जगदीश माळी हे रस्त्यावर भिकाऱ्यांच्या पंक्तीत आढळल्यानंतर अंतरावर अनेक प्रश्नांची सरबत्ती होत होती. त्यावर अखेर अंतरानं प्रतिक्रिया दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 17, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, मुंबई
प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अभिनेत्री अंतरा माळी हिनं अखेर आपलं मौनव्रत सोडलंय. अंतराची वडील जगदीश माळी हे रस्त्यावर भिकाऱ्यांच्या पंक्तीत आढळल्यानंतर अंतरावर अनेक प्रश्नांची सरबत्ती होत होती. त्यावर अखेर अंतरानं प्रतिक्रिया दिलीय.
‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली मिंक बरार ही आपल्या भावासोबत वर्सोवाच्या रोडवर बसलेल्या भिकाऱ्यांना घोंगड्या दान करत असताना तिला या भिकाऱ्यांच्या रांगेत जगदीश माळी आढळले होते. आपण अंतराला फोन करून तिच्या वडिलांबद्दल माहिती दिल्याचं मिंकनं म्हटलं होतं. ‘आपल्याला नुकतंच एक बाळ झालंय आणि त्यामुळेच खूप बिझी आहे’असं अंतरानं म्हटल्याचं समजल्यानंतर मिंकनं सलमान खानला याबद्दल कळवलं होतं. त्यानंतर `बिईंग ह्युमन` या समाजसेवी संस्थेच्या मदतनिसांनी तातडीने तेथे येत , माळी यांना त्यांच्या घरी नेले होते.
याबद्दलच अंतरा हिच्यावर अनेकांनी टीका केली होती. या टीकेनंतर वैतागलेल्या अंतरानं अखेर वृत्तपत्रांना आपली प्रतिक्रिया लिहून कळवलीय. यामध्ये आपल्या वडीलांचं ३५ वर्षांचं करिअर संपवण्यासाठी या अफवा पसरवल्या गेल्याचं तिनं म्हटलंय. तसंच मिंकनं सांगितलेल्या ‘स्टोरी’चं देखील तिनं खंडन केलंय.
‘माझ्या वडील व्यसनी नाहीत. ते निराशेचे बळी ठरले होते. त्यांची परिस्थिती अशी होती की, चुकून एखाद्या वेळेस ते आपलं इन्सुलिन घ्यायचं विसरले अस्वस्थ होत असंत. अशा वेळेस एखादं कुलूप उघडण्याचं कामही त्यांनी कठिण होत होतं. अशी परिस्थिती क्वचितच सहा महिन्यांतून क्वचितच एखाद्या वेळेस उद्भवते. पण, इतर वेळेस मात्र ते सर्व कामे व्यवस्थितरित्या करत आणि ते अगदी नार्मल असतात. त्या दिवशीही नेमकं हेच घडलं. ते इन्सुलिन घ्यायचं विसरले...’ असं अंतरानं स्पष्ट केलंय.

‘हा फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुणीतरी उगाचच स्टंट केलाय आणि यासाठी माझ्या वडिलांच्या आजाराचं भांडवल केल्यानं त्यांचं ३५ वर्षांचं करिअर धुळीला मिळण्याची शक्यता आहे. माझ्या वडील व्यसनाधीन कधीच नव्हते. त्यांना ‘क्रोनिक लिव्हर डिसऑर्डर’ आणि मधुमेहाचा त्रास आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्यांनी मद्याला हातही लावलेला नाही’ असं अंतरा माळी हिनं आपल्या लिखित प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय.
अंतरा म्हणते, ‘आम्हाला कुणाच्याही मदतीची अथवा दयेची गरज नाही. मला माझ्या वडिलांविषयी पूर्ण आदर आहे. ते खरोखरच एक उत्कृष्ठ कलाकार आहेत. त्यांनी मोठ्या मेहनतीनं फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलंय.