www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचे कलाकार सायबर क्राईमविषयी नागरिकांना जागरुक करताना दिसणार आहेत. नागरिकांना विशेषत: लहान मुलांना सायबर क्राईमपासून संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मिनिटाची फिल्म बनवलीय. आजपासून थिएटरमध्ये राष्ट्रगीतानंतर ही फिल्म दाखवण्यात येणार आहे.
नेहमीच लेटेस्ट गॅजेट्सने अपडेट असणारे बिग बी आता महिला आणि मुलांना सायबर क्राईमपासून सुरक्षित राहण्याचा संदेश एका फिल्ममध्ये देताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर बिग बी यांच्याप्रमाणेच शाहरुख, प्रियांका चोप्रा आणि अनिल कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. इंटरनेटचा वापर कसा करावा? यासंदर्भात हे सेलिब्रिटी मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई पोलिसांनी बनवलेल्या या फिल्मला सेन्सॉर बोर्डानेही मंजुरी दिलीय. अनोळखी लोकांशी मैत्री करु नका, तसंच आपल्या खाजगी गोष्टी कोणाशीही शेअर करु नका, आपल्या अकाउन्टचा पासवर्ड तीन तीन महिन्यांनी बदलत रहा, अशा सूचना करताना हे सेलिब्रिटींनी या फिल्ममध्ये दिसतात.
या फिल्मप्रमाणेच २७ सेलिब्रिटींसह पाच पाच मिनिटांच्या तीन सीडीज तयार करण्यात आल्यात. शाळा, कॉलेज क्लब, हाऊसिंग सोसायटी आणि कॉर्पोरेट हाऊसेसमध्येही या सीडीज देण्यात येणार आहेत. सायबर क्राईमबद्दल नागरिकांना जागृत करण्यासाठी मुंबई पोलिसांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.