www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
“दारूमुळे मी स्वतःचं नुकसान करून घेतलं, आणि माझं करिअर बरबाद झालं”, अशी कबुली गेल्या जमान्यातील सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी दिली आहे. धर्मेद्र ‘यमला पगला दिवाना २’ या सिनेमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
७७ वर्षीय धर्मेंद्र ६० आणि ७० च्या दशकात देखण्या रुपामुळे आणि पिळदार शरीरयष्टीमुळे लोकप्रिय होते. मात्र नंतरच्या काळात दारूच्या व्यसनामुळे अभिनय कारकीर्दीवर विपरीत परिणाम होऊन धर्मेंद्र सिनेसृष्टीपासून दूर झाले. मात्र आपली दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अपने’, ‘यमला पगला दिवाना’ हे सिनेमे केल्यावर ‘यमला पगला दिवाना’ सिनेमाचा पुढील भाग ‘यमला पगला दिवाना २’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. आता दारू पूर्णपणे सोडून सिनेमावर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं धर्मेंद्रने कबुल केलं.
“मी आता दारू पित नाही. दारूमुळे मी आधीच स्वतःच खूप नुकसान केलं आहे. आता मी सिनेमावर माझं लक्ष पूर्णपणे केंद्रित केलं आहे.” असं धर्मेंद्रने म्हटलं. २०११ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्रनी दारू पिणं बंद केलं आहे. आता धर्मेंद्र या व्यसनापासून मुक्त असल्याचं सांगतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.