सिनेमा : ग्रँड मस्ती
निर्माता : इंद्र कुमार
कलाकार : रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, विवेक ऑबेरॉय, करिश्मा तन्ना, मंजरी फडणीस, सोनाली कुलकर्णी, प्रदीप राऊत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२००४ साली आलेल्या ‘मस्ती’ सिनेमाचा सिक्वल ‘ग्रँड मस्ती’... चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांना या चित्रपटाची निर्मिती करताना कथेची आवश्यकता अजिबात भासलेली नाही... तुम्ही ‘मस्ती’ पाहिला असेल तर तुम्हालाही या सिनेमात नवीन कथा पाहायला मिळेल, अशी आशा ठेवण्याची गरज नाही.
स्त्रियांचं जेवढं वेडंवाकडं प्रदर्शन करता येईल तेवढं करून हास्यनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. आजकालच्या गल्लाभरू सिनेमांच्या यादीत आणखी एका सिनेमाची भर पडलीय असं म्हणता येईल. या सिनेमाला आणि डबल मिनिंग कॉमेडीला काहींच्या शिट्या आणि टाळ्या मिळतीलही पण, आपल्या पार्टनरसोबत कदाचित हा सिनेमा पाहणं त्यांना फाजील वाटू शकतं.
सिनेमाची तीच कथा...
लग्नानंतर पुरुषांना वेळ न देऊ शकणाऱ्या आणि पर्यायानं आपल्या पतींना खूश न करू शकणाऱ्या बायका.... आणि आपल्या घरातील बायकोला कंटाळलेले पुरुष... अशा पुरुषांच्या भूमिकेत पुन्हा एकदा रितेश, विवेक आणि आफताब दिसतात. ‘सेक्स कॉमेडी’चा तडका देऊन हीच कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणली गेलीय. मग, हेच ‘बिचारे’ नवरे ‘एक्स्ट्रा स्पाईस’साठी मेरी, रोज आणि मार्लो यांच्यापाठी ‘मस्ती’च्या शोधार्थ जातात. या भूमिका निभावणाऱ्या ब्रूना अब्दुल्ला, कायनात अरोरा आणि एम. जकारिया यांनी चित्रपटात ‘स्पाईस’ निर्माण करण्यात काहीही कमतरता ठेवलेली नाही.
अश्लील संवादांनी परिपूर्ण
अश्लील संवाद ऐकवून आणि तेच अर्धनग्न वेडेवाकडे हावभाव करून प्रेक्षकांना हसवण्याचा हा प्रकार पहिल्यांदा होतोय असंही नाही. यासारख्या सिनेमांना प्रेक्षकही मिळतात आणि पैसेही... त्यामुळे असे सिनेमा निर्माण होतंच राहणार... आणि अशा सिनेमांत कलाकारांना काम करण्यातही वावगं वाटणार नाही. परंतु, या सिनेमातील एकाही सिनमध्ये कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करावं, असं चुकुनही तुमच्या मनात येणार नाही.
स्त्रियांचा वापर...
संपूर्ण सिनेमात अभिनेत्रींचा वापर एखाद्या प्रोडक्टप्रमाणेच करण्यात आलाय. यामध्ये मराठमोळ्या मंजरी फडणीस, सोनाली कुलकर्णी यांच्यासोबतच करिश्मा तन्ना यांनी ‘घरगुती’ पत्नींच्या भूमिका पार पाडल्यात. त्यामुळे त्यांना पाहणं जड जात नाही. पण, तेच रितेश, विवेक आणि आफताब यांच्याकडे पाहून ‘यांना समजलेली कॉमेडी हीच का?’ असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल.
एकूणच काय तर…
सध्या समाजात घडत असलेल्या घटनांच्या पाश्वभूमीवर हा सिनेमा `किळसवाणा` वाटला तरी तुम्ही 'गुजरे जमाने के' वगैरे ठरणार नाहीत. `घर की मुर्गी दाल बराबर` असली तरी तीच चालवून घ्या, असा संदेश तुम्हाला हा चित्रपट पाहूनच आत्मसात करता येईल, असंही नाही... किंवा या सिनेमातील डबल मिनिंग संवाद आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर बोलून दाखवून तुम्ही हास्यनिर्मिती कराल याचीही शक्यता कमीच... त्यामुळेच पाहावं असं या सिनेमात काहीही नसल्यानं टाळला तरी चालेल...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.