फिल्म रिव्ह्यू : आलिया-रणदीपचा `हाय वे` प्रवास!

इम्तियाज अली दिग्दर्शित `हाय वे` बॉक्स ऑफिसच्या रस्त्यावर उतरलीय. आलिया भट आणि रणदीप हुडा या जोडीचा हा पहिलाच सिनेमा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2014, 11:38 AM IST


सिनेमा : हाय वे
दिग्दर्शक : इम्तियाज अली
निर्माता : साजिद नाडियादवाला
संगीत : ए. आर. रेहमान
कलाकार : आलीया भट, रणदीप हुडा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इम्तियाज अली दिग्दर्शित `हाय वे` बॉक्स ऑफिसच्या रस्त्यावर उतरलाय. आलिया भट आणि रणदीप हुडा या जोडीचा हा पहिलाच सिनेमा...
काय आहे सिनेमाचं कथानक
सिनेमाची कथा सुरू होतेय आलिया भट्टपासून... म्हणजेच वीरापासून... वीराच्या घरी तिच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रात्रीच्या अंधारात सगळ्यांपासून लपून वीरा आपल्या घरातून बाहेर पडते ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडते.
त्यांची गाडी पेट्रोल पंपवर थांबली असताना ज्याक्षणी वीरा गाडीतून बाहेर निघते त्याच वेळी काही अपहरणकर्ते तिचं अपहरण करतात. या अपहरणकर्त्यांमध्ये महावीर भाटी म्हणजेच रणदीप हुडाचाही समावेश आहे.
वीरा एका श्रीमंत बापाची मुलगी आहे, हे या गँगला समजतं.... आणि त्यांना दरदरून घाम फुटतो. मात्र, महावीर मात्र कशालाच घाबरत नाही. वीराला आपल्या ट्रकमध्ये जबरदस्तीनं बांधून तो एका जागेवरून दुसऱ्या हाय वे वरून फिरत राहतो.
काही वेळानंतर वीरालाही हा प्रवास चांगला वाटायला लागतो... आता, तिला पुन्हा घरी परतण्याची इच्छाही होत नाही. पण, वीराच्या घरी न जाण्यामागे खरं कारण मात्र वेगळंच असतं... आता, हे नेमकं कारण काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
चित्रपटातील जमेची बाजू
सिनेमात भारतातल्या सहा राज्यांची सुंदरता मोठ्या खुबीनं टिपलीय. `स्टुडंट ऑफ द इअर` फेम आलिया या चित्रपटात `स्टुडंट` राहिलेली नाही हे सतत जाणवत राहतं. `हरियाणा का जट` असा रोल रणदीप हुडानं चांगलाच पेललाय.
काही उणीवा...
सिनेमाचं कथानक आणि स्क्रिन प्ले थोडं हरवल्यासारखं वाटतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीला या चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगायचंय हे शेवटपर्यंत समजत नाही.
एका पळू पाहणाऱ्या ट्रकला पोलीस अडवतात आणि चौकशी करतात... अशा वेळेस वीराच्या जवळ पळण्यासाठी चांगली संधीही आहे. परंतु, तरिही ती लपून राहते आणि पोलिसांच्या नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न करते.... कशासाठी? आणि असं बरंच काही...

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा हा चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. कदाचित, केवळ रस्त्यावर किंवा गरीब घरांतच दुष्कर्माच्या घटना घडतात असं नाही तर श्रीमंत घरातही अशा घटना घडतात असं काहीसं दाखवण्याचा इम्तियाज दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण, कहानी थोडी ढिसाळ असल्यानं हा प्रयत्न फसल्याचंच दिसतंय.
बाकी, आलिया किंवा रणदीपचे फॅन असाल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहू शकता...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.