'हिरोईन'वर करीनाच्या अभिनयाची बोल्ड छाप!

दीर्घकाळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेली ‘हिरोईन’ अखेरिस प्रेक्षकांच्या समोर प्रकट झालीय. मधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 22, 2012, 04:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
दीर्घकाळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेली ‘हिरोईन’ अखेरिस प्रेक्षकांच्या समोर प्रकट झालीय. मधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात. मधुरच्या चित्रपटाची हिरोईन हीच या सिनेमाची खासियत आहे. हिरोईन हा सिनेमा माही अरोरा (करीना कपूर) या कॅरेक्टरभोवती फिरतो. मधुर भांडारकरच्या इतर सिनेमांप्रमाणेच त्याचा हा सिनेमादेखील बॉलिवूडसारख्या खोटी चमक असलेल्या दुनियेवर भाष्य करणारा आहे. स्वतःच यश आणि पद टिकवून ठेवण्यासाठी स्वत्वाचे कसं बलिदान दिलं जातं किंबहुना द्यावं लागतं, याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलंय.

एका छोट्या शहरातून माही अरोरा (करीना कपूर) हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येते. तसं तिचं स्वप्न पुढे साकारही होतं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यावर तिच्या आयुष्यात कसे बदल होतात, यासंदर्भात हा सिनेमा आहे. हिरोईनमधील नायिका माही अरोरा (करीना कपूर) ही एक सुपरस्टार आहे. इतर सर्व हिरोईन्स माहीसोबत स्पर्धा करत असतात. तिचा को-स्टार ‘आर्यन’सोबत (अर्जुन रामपाल) तिचे प्रेमप्रकरण चालू असतं. आर्यनचा पत्नीसोबत घटस्फोट झालेला असतो. आर्यनचे दुसऱ्या हिरोईन्ससोबत असलेली प्रेमप्रकरणं जेव्हा माहीला समजतात तेव्हा ती आर्यनशी ब्रेकअप करते. यानंतर माही एका क्रिक्रेटर (रणबीर हुडा)सोबत आपले प्रेमसंबंध जुळवते. पण स्वतःच्या करिअरसाठी त्याला ही सोडून देते. आयुष्यात होणाऱ्या असंख्य बदलांमुळे आणि एकटेपणामुळे माही मूडी आणि चिडचिडी बनते. कोणाचही न ऐकणारी माही स्वतःला सिगारेट आणि दारूच्या नशेत झोकून देते.

अशी एकापाठून एक माहीच्या आयुष्याला उतरती कळा लागल्याने ती खचते आणि मनोवैज्ञानिकांकडून स्वतःची ट्रिटमेंट करते. फॅशनमध्ये ज्याप्रकारे प्रियांका चोप्रा स्वतःची इमेज पुन्हा जगासमोर वेगळ्या प्रकारे आणते तसेच हिरोईन या चित्रपटात माही देखील स्वतःला अनोख्या प्रकाराने सिद्ध करते. हिरोईन चित्रपट पाहताना फॅशन चित्रपटाची थोडीफार झलक दिसून येते. प्रियांका आणि करीनाच्या पात्रांमध्ये खूप समानता असल्याच कित्येत वेळा भासत. चित्रपटाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे करिनाने केलेला अभिनय. करीनाची अभिनयाची अदाकारा कौतुक करण्याजोगी आहे. करिनाने आपला जीव पणाला लावून अभिनय केलाय हे पदोपदी जाणवतं. रणबीर हुड्डा आणि अर्जुन रामपाल हे दोघे सहायक अभिनेत्यांच्या भूमिकेत आहेत.
कॉर्पोरेट, ट्राफिक सिग्नल, चांदणी बार, आणि फॅशन यांसारखे चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना मधुरच्या हिरोईनबद्दलही खूप आकर्षण होते. पण सिनेमाबद्दल असलेली उत्सुकता पूर्ण होत नाही. सिनेमाचा पहिला अर्धा भाग पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना उर्वरीत सिनेमा कळेल. चित्रपटाचीही गाणीही बॉलिवूडमधल्या साधारण गाण्यांसारखीच आहेत. हिरोईन सिनेमाचं हलकट जवानी हे आयटमसॉंग सिनेमा रिलीज होण्याआधीचं गाजलं होतं.
प्रेक्षकांनी मनात जसा हिरोईन चित्रपट बनवला होता तसा त्यांना तो पाहायला मिळाला नाही. सिनेमात खच्चून बोल्ड सिन्स भरले आहेत. एकंदरीत करीनाच्या फॅन्सना हिरोइनमध्ये करीनाची वेगळी प्रतिमा पाहायला मिळेल आणि मधुरच्या चाहत्यांचे तोंड अपेक्षाभंग झाल्याने आंबट-तूरट होणार आहे.