शाहरुखच्या चित्रपटात `हिरोईन`ला प्राधान्य!

महिला दिन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला तिथं शाहरुख खानही हा दिवस आणखी खास बनवलाय. यावेळी शाहरुखनं एक वेगळी शपथच घेतलीय म्हणा ना!

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2013, 11:38 AM IST

www.24taas.com, मुंबई
महिला दिन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला तिथं शाहरुख खानही हा दिवस आणखी खास बनवलाय. यावेळी शाहरुखनं एक वेगळी शपथच घेतलीय म्हणा ना!
ही शपथ म्हणजे, यापुढे शाहरुखच्या प्रत्येक चित्रपटात क्रेडीट स्क्रोलवर अभिनेत्याऐवजी अभिनेत्रीचं नाव पहिल्यांदा असेल. जागतिक महिलादिनी मीडियाशी बोलताना शाहरुखनं ही घोषणा केलीय. ‘यापुढे माझ्या प्रत्येक चित्रपटात अभिनेत्याचं नाही तर अभिनेत्रीचं नाव पहिल्यांदा येईल आणि मी ज्या लोकांबरोबर काम करतो त्यांनाही मी विनंती करेन की त्यांनीही ही पद्धत रुढ करायला सुरू करावी... मला माहित नाही की यामुळे काही सामाजिक बदल घडून येऊ शकेल की नाही पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे’ असं यावेळी शाहरुखनं म्हटलंय.

शाहरुख स्वत: याची सुरुवात करणार आहे, तीही त्याच्या आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमापासून... या चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे दीपिका पदूकोन. त्यामुळे हा मान दीपिकाला मिळणार आहे. शाहरुख म्हणतो, ‘महिला आपल्यासाठी आपल्या ‘बॅकबोन’चं काम करतात त्यामुळे त्यांना योग्य श्रेय मिळायलाच हवं. मी माझ्या वतीनं प्रत्येक सिनेमात माझ्या महिला सह-कलाकगारांना योग्य श्रेय मिळेल, यावर लक्ष ठेवतो. पण, फक्त दिखाव्यासाठी मी महिलांवर आधारित चित्रपटनिर्मिती करणार नाही.’