www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठीतला सुपरस्टार भरत जाधवची फसवणूक झाल्याची बातमी `झी २४ तास`ने दाखवताच याची दखल मनसेकडून घेण्यात आली आहे. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भरत जाधवच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत आणि त्याला न्याय मिळवून देऊ अशी प्रति्क्रिया `झी २४ तास`कडे दिली. मनसे भरत जाधवचे पैस मिळवून देईल. तसेच जो पर्यंत त्याचे पैसे त्याला मिळत नाही तो पर्यंत निर्मात्यांना कामही करू देणार नाही. असा सज्जड दमच मनसेकडून देण्यात आला आहे. ‘शिवाजी द रियल हिरो’ या सिनेमाचे निर्माते सदाशिव पाटील यांनी भरत जाधवची फसवणूक केली आहे.
भरतचं ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेताच दोन महिन्यांपूर्वी हा सिनेमा रिलीज करण्यात आला. शिवाय भरतचे अनेक सीन्स अर्धवट ठेवून दुस-याकडूनच डबिंग करण्यात आलं. एवढंच नाही तर निर्मात्यानं भरतला दिलेले चेक्स देखील बाऊन्स झाले. काही दिवसांपूर्वी डॉ. गिरीश ओक यांचा आवाज वापरून निर्माता रामगोपाल वर्मानं त्यांची फसवणूक केली होती. आता सदाशिव पाटील या निर्मात्यानं भरतची फसवणूक केली आहे.
भरतचे काही महत्वाचे सीन्स राहिले असतानाचा त्याला डबिंग करण्यासाठी त्याला आग्रह करण्यात आला. या राहिलेल्या सीन्सबद्दल विचारणा करताच निर्मात्यांनी टाळाटाळ केली. भरतसाठी दुस-याच कुणीतरी कुणीतरी डबिंगही केल्याचं नंतर उघड झालं.
सिनेमा रिलीज पूर्वी त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांची ना हरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं. मात्र भरतला कोणतीही कल्पना नं देताच दोन महिन्यांपूर्वीच हा सिनेमा रिलीजंही करण्यात आला. इतकंच नाही तर निर्मात्यांनी सुरुवातीला भरतला दिलेले धनादेशंही वठले नाहीत. तर राहिलेल्या शुटिंगचे पैसेही देण्यात आले नाहीत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.