www.24taas.com, मुंबई
मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय, मराठी प्रेक्षकांना नवनवीन काहीतरी देण्याचा मानस प्रत्येक दिग्दर्शकानं बांधलाय. त्यामुळे हिंदी नंतर आता रहस्यपटांचा ट्रेंड मराठीतही पहायला मिळतोय...पुणे 52 या रहस्यमय पटानंतर आता `अशाच एका बेटावर` हा सिनेमाही प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.
जगप्रसिद्ध कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती यांच्या 70 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या `ऍन्ड देन देअर वेअर नन` या कादंबरीवर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. मायानगरी मुंबईतील 9 अनोळखी व्यक्ती निर्मनुष्य बेटावर एकाकी बंगल्यात गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी जातात. आणि मग त्यांच्या भोवती अनपेक्षित घटनांची मालिकाच सुरू होते.आणि घडतो अशाच एका बेटावर हा सिनेमा.
8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या निमित्तानं सृष्टी फिल्म्स च्या माध्यमातून लिना नांदगावर निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करणारेत तर लेखक संजय पवार आणि चिंतन मोकाशी यांनी या सिनेमाची पटकथा लिहीलीये. अलिबागच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत झालेल्या या सिनेमात अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, मधुरा वेलणकर, सई ताम्हणकर, यतिन कार्येकर, शरद पोंक्षे, संजय मोने, मंगेश देसाई, कमलेश सावंत, पूनम जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘नो एंट्री- पुढे धोका’ आहे या सिनेमानंतर पुन्हा सई ताम्हणकर या सिनेमात बिकिनीमध्ये दर्शन द्यायला सज्ज झालेली आहे. मराठीत बिकिनी कल्चर प्रसिद्ध करणाऱ्या सईने `अशाच एका बेटावर` सईने ब्लॅक बिकिनी घालून धुमाकूळ घातला आहे. सो थरार, उत्कंठा, भीती याचा खिळवून ठेवणारा अनुभव देण्यात ही संपूर्ण टीम यशस्वी होते का हे 8 फेब्रुवारीला स्पष्ट होईलच.