www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याला धमक्या देण्यात आल्यात. मुस्लिम शेखची आज सेशन्स कोर्टात साक्ष होणार होती. मात्र साक्षीपूर्वीच त्याला धमक्या देण्यात आल्याचा दावा मुस्लिम शेखनं पत्राद्वारे न्यायालयापुढं केलाय. 5 लाख रूपये घे आणि तोंड बंद कर, अशी धमकी त्याला देण्यात आलीय.
सिने अभिनेता सलमान खानचं टेन्शन आणखी वाढलंय. कारण 12 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या वेळी सलमान खान हाच गाडी चालवत होता, असं `हिट अँड रन` खटल्यातील दोघा साक्षीदारांनी कोर्टात सांगितलंय... एवढंच नव्हे तर तो दारूच्या नशेत असल्याचं साक्षीदारांनी सांगितल्यानं सलमान चांगलाच गोत्यात आलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मेला होणार आहे.
28 सप्टेंबर 2002 रोजी वांद्रे बेकरीजवळ सलमान खानच्या टोयोटा लॅन्ड क्रूझर गाडीला झालेल्या अपघातात 1 जण ठार, तर चारजण जखमी झाले होते. बारा वर्षांपूर्वीच्या या हिट अँड रन खटल्याची आता सेशन्स कोर्टात नव्याने सुनावणी सुरू झालीय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सिने अभिनेता सलमान खान मंगळवारी स्वतः कोर्टात हजर होता.
अपघातात जखमी झालेल्या मुस्लिम शेख आणि मुन्नु खान या दोघा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, तेव्हा त्या दोघांनीही सलमानला ओळखलं. अपघात झाला तेव्हा आपण गाडी चालवत नव्हतो, असं सलमान खानचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मुस्लिम खाननं साक्षीत स्पष्टपणे सांगितलं की,
मी त्याकाळी ए1 बेकरीत काम करत होतो. अब्दुल, समील, मुन्ना हे माझ्यासोबत कामाला होते. हा अपघात रात्री साधारण पावणेतीनच्या सुमारास घडली. आम्ही फुटपाथवर झोपलो असताना अचानक मोठा आवाज झाला. मला जाग आली, तेव्हा मी गाडीखाली होतो. एक गाडी माझ्या पायावरून गेली होती आणि लोक आम्हाला मदत करायला धावले. त्या गाडीतून ड्रायव्हर सीटवरून सलमान खान बाहेर आला. त्याच्यासोबत एक पोलीसवाला होता. तो गाडीबाहेर आला तेव्हा त्याला लोकांनी पकडलं. नंतर मला दवाखान्यात नेण्यात आलं. तो समोर आरोपीच्या बॉक्समध्ये बसलाय, तोच सलमान खान आहे. त्यानंच आमच्या अंगावर रात्री गाडी चढवली.
मुस्लिम शेखसोबतच मुन्नू खाननंही सलमानला ओळखलं. साक्षीदारांच्या या जबाबामुळे कोर्टात उपस्थित सलमान चांगलाच अस्वस्थ झाला. बॉक्समध्ये अस्वस्थपणे येरझारा घालू लागला. तो कधी उभा राहत होता, तर कधी बसत होता. काही काळ कुशीत डोकं खुपसून तो बसला होता. साक्षीदारांची साक्ष तो लक्षपूर्वक ऐकत होता.
सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचाही या खटल्यात समावेश झाल्यानं सलमानची डोकेदुखी आधीच वाढलीय. आता दोघा साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळं सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात दोषी ठरल्यास सलमानला दहा वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते, असं बोललं जातंय. त्यामुळं बॉलिवूडच्या या सिनेता-याचेच तारे गर्दीशमध्ये असल्याचं स्पष्ट होतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.