www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
जादूई आवाजातील स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणजे काय. याचं उत्तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यापेक्षा दुसरं काय असू शकतं. आपल्या लाडक्या लतादीदींचा आज ८४वा वाढदिवस. त्यानिमित्त या गानकोकिळेला हा सलाम...
लता मंगेशकर... तमाम भारतवासियांसाठी एक अभिमान, आदर आणि स्फूरणंही... वयाच्या तेराव्या वर्षापासून सुरू झालेली लतादीदींची ही सांगितिक सफर.. ‘ब्लॅक अँन्ड व्हाईट’ सिनेमाचा जमाना असो की कलरफुल सिनेमांचा. या जादूई स्वरांची मोहिनी तमाम रसिक मनावर नेहमीच राज्य करून राहिली.
‘बाहो मे चले आ’... सारखं रोमॅन्टिक गाणं असो की, ‘अपलम चपलम’सारखं अवखळ गाणं असो लतादीदींनी त्यावर अशी काही छाप उमटवली की ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. पिढी बदलत गेली, मात्र लतादीदींच्या आवाजातला गोडवा आहे तसाच आहे.
लतादीदींचा स्वर नेहमीच उंच उंच बहरत गेला. जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीशीही तितकच छान आणि तरल ट्युनिंग जमलं. म्हणूनच पिढी बदलली तरी आवाजाला वयाचं बंधन नसतं हेच पुन्हा पुन्हा या गानकोकिळेनं जणू सिद्धच केलं.
देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांना मंगेशकर भावंडांच्या रुपानं एक अनोखं गिफ्ट मिळालंय. त्यात लतादीदींच्या जादूई सुरांमध्ये रसिक नेहमीच चिंब झालेत. भारतरत्न या मानाच्या किताबासह, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेल्या लतादीदींना झी मीडियाकडून वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा... या स्वरांची गोडी अशी कायम राहो, हीच प्रार्थना!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.