www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.
झहीर खान हा टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटचा तारणहार आहे. कारण टीम इंडियाचं बॉलिंग डिपार्टमेंट सध्या संकटात आहे. हो संकटातच आहे... म्हणूनच टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीरचा वन-डे टीममध्ये समावेश नसताना देखील झहीरला वन-डे टीमबरोबरच दक्षिण आफ्रिकेला घेऊन जाण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे... आणि बीसीसीआयनं देखील ही विनंती मान्य केली आहे.
२ डिसेंबरला वन-डे टीमबरोबरच झहीर खानला दक्षिण आफ्रिकेत घेऊन जाण्यासाठी धोनीनं विनंती केली आहे. झहीरकडे खूप अनुभव आहे. यामुळं टीमबरोबर त्याचं असणं देखील खूप फायदेशीर ठरणार असल्याचं टीममधील खेळाडूंचं म्हणणं आहे. याशिवाय टेस्ट सीरिजपूर्वी झहीर खानला तिथल्या वातावरणाशी देखील जुळवून घेता येणार असल्याची माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेवर जाणाऱ्या वन-डे टीममध्ये शमी अहमद, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव आणि ईशांत शर्माचा समावेश आहे. यातील ईशांत शर्मा सोडला तर एकाही बॉलरला दक्षिण आफ्रिकेतील वातावरणामध्ये खेळण्याचा अनुभव नाही. यामुळं अशा बिकट प्रसंगी अनुभवी तेज तर्रार झहीर खानशिवाय आता पर्यायच नाही हे कॅप्टन धोनीच्या लक्षात आलं.
यामुळंच टीममध्ये समावेश असावा निदान मेन्टॉरच्या भूमिकेत तरी तो टीमबरोबर असाला असं कॅप्टन धोनीला वाटलं असावं. झहीर भलेही अनेकदा दुखापतींमुळं टीमच्या आत-बाहेर होत असेल. मात्र, तरीही तो भारतीय बॉलिंग डिपार्टमेंटचा सचिन तेंडुलकर आहे अस वर्णन खुद्द कॅप्टन धोनीनंच यापूर्वी केलेलं आहे आणि म्हणूनच आता टीम इंडियाच्या बॉलिंगची चिंता भेडसावत असताना धोनीनं झहीरला टीमच्या मदतीसाठी धाव अशी विनंती केली आहे.
जर एखाद्या बॉलरला आपली मदत हवी असेल तर आपण मदत करायला तयार आहोत. याबाबात मला कधीही संकोच वाटणार नाही. एका फास्ट बॉलरसाठी कामगिरी करणं सोपं नसतं. यामुळंच त्यांना प्रेरणा आणि आत्मविश्वास देणं गरजेच असल्याचं झहीरनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
दरम्यान झहीर सध्या मुंबई रणजी टीमची कॅप्टन्सी करत आहे. मात्र बीसीसीआयनं पाचारण केल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला सुद्धा आपण आगामी काही मॅचेससाठी उपलब्ध नसल्याचं त्यानं सांगितलंय. शिवाय एमसीएनंही त्याची ही विनंती मान्य केली आहे. आता झॅकच्या उपस्थितीमध्ये टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये सुधारणा होते का याकडंच भारतीय फॅन्सच लक्ष लागून राहिलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.