www.24taas.com, राजकोट
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांचा २२ वर्षांचा संसार मोडण्याच्या तयारीत असताना टीम इंडियाचा उगवता तारा चेतेश्वर पुजाराचा साखरपुडा झाला आहे. चेतेश्वरची विकेट पूजा हीने घेतली आहे.
राजस्थानमधील पूजा पाबारी हिच्याबरोबर चेतेश्वरचा मंगळवारी साखरपुडा झाला. यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. १५ नोव्हेंबरपासून भारत- इग्लंड कसोटी मालिकेत चेतेश्वरला संघात स्थान मिळाले आहे. २५ वर्षांच्या चेतेश्वरने पूजा पाबारीला वेडिंग रिंग घातली.
चेतेश्वरने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंडच्या विरोधात पहिले कसोटीत शतक ठोकले आणि त्याच्या नावाचा बोलबाला झाला. पुजाराने १६९ चेंडूत १४ चौकार आणि एक षटकार याच्या मदतीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते.
राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी संघात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याची क्षमता पुजारात नक्कीच दिसल्याने भारतीय क्रिकेट निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला आणि संघात स्थान दिले.
राजस्थानमधील माऊंट अबू येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या पूजाने मुंबईमध्ये रिटेलमध्ये एमबीए केले आहे. पूजाचे वडील रसिक पाबारी `कमोडिटी`चे व्यावसायिक आहेत. पाबारी कुटुंब मूळचे जोधपूरचे आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासन राजकोटमध्ये व्यवसाय करीत आहेत.