www.24taas.com, वृत्तसंस्था, जयपूर
सरस धावगतीच्या आधारावर उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आवश्यक असलेला विजय मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि ड्वेन स्मिथ यांच्या दमदार खेळीमुळे शक्य झाला. मुंबई इंडियन्सने पर्थ स्कॉर्चर्सचा सहज पाडाव करून चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
मुंबई इंडियन्सचा उपांत्य फेरीचा सामना ५ ऑक्टोबरला त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाशी होणार आहे. बुधवारच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला त्रिनिदादने ८ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे पहिला उपांत्य फेरीचा सामना ४ ऑक्टोबरला चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये रंगणार आहे.
पर्थ स्कॉर्चर्सच्या विजयासाठीच्या १५० धावांचे आव्हान मुंबईला सरस धावगतीच्या बळावर उपांत्य फेरी गाठण्यासाठी १४.२ षटकांत पार करायचे होते. अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर शून्यावर बाद होऊन माघारी परतला तरी स्मिथ आणि रोहित शर्मा यांनी तुफान फटकेबाजी करीत मुंबईला हे उद्दिष्ट १३.२ षटकांतच गाठून दिले.
पर्थ स्कॉचर्सचे लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकांत सचिनच्या रूपाने मुंबईने पहिला मोहरा गमावला. पण स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार नाही याची पुरेपुर काळजी रोहित आणि स्मिथने घेतली.
रोहित आणि स्मिथने पर्थ स्कॉर्चर्सच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. स्मिथने २५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. स्मिथ बाद झाल्यावर रोहितने किरॉन पोलार्ड (२३) आणि अंबाती रायुडूसह (नाबाद १४) सुरेख खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिला. २४ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी करून नाबाद ५१ धावांची लयलूट करणारा रोहित सामनावीराचा मानकरी ठरला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.