www.24taas.com, नवी दिल्ली
इंग्लंडचा माजी कॅप्टन ज्योफ्री बॉयकॉटच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत हार पचवावी लागली तर सचिन संपूर्ण क्रिकेटलाच राम राम ठोकू शकतो आणि क्रिकेटप्रेमींनाही त्याला नेहमी-नेहमी पराभवाच्या छायेत जगताना पाहणं अजिबात रुचणार नाही.
‘सचिन नक्कीच आगामी ऑस्ट्रेलिया मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जीवतोड मेहनत घेईल, पण आमच्यापैकी कुणीही त्याला पराभव स्वीकारताना पाहणं नक्कीच आवडत नाहीय. जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजमध्येही तो अपयशी ठरला तर मला खात्री आहे की तो संपूर्णरित्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल. म्हणूनच त्यानं चांगली कामगिरी करावी यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत’ असं बॉयकॉटनं म्हटलंय.
‘वनडेतून निवृत्ती स्वीकारणं हा निर्णय घेणं सचिनला नक्कीच जड गेलं असेल. तो उत्कृष्ट फलंदाज होता, उत्कृष्ट प्रतिस्पर्धी होता पण तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिद्ध होऊ शकला नाही आणि केवळ आठवणींवर आपण जगू शकत नाही. त्यानं विचारपूर्वकच हा निर्णय घेतलाय’ असंदेखील बॉयकॉटनं म्हटलंय.
मास्टर ब्लास्टरनं गेल्या रविवारी एक दिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं आणि यासोबतच त्याच्या तब्बल २३ वर्षांच्या वनडे करिअरचा अंत झालाय. या करिअरमध्ये अगणित रेकॉर्डस् त्यानं आपल्या नावावर नोंदविले आहेत.