'एमसीए'समोर मुंडे देणार मुंबईकर असल्याचे पुरावे!

एमसीए निवडणुकीसाठीची उमेदवारी रद्द झाल्यामुळं नाराज झालेले गोपीनाथ मुंडे आज एमसीएसमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहेत. मुंडेंना आज एमसीएनं वेळ दिल्याची माहिती मिळालीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 16, 2013, 11:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एमसीए निवडणुकीसाठीची उमेदवारी रद्द झाल्यामुळं नाराज झालेले गोपीनाथ मुंडे आज एमसीएसमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहेत. मुंडेंना आज एमसीएनं वेळ दिल्याची माहिती मिळालीय.
मुंबईतल्या आपल्या रहिवासाबाबतचे पुरावे मुंडे एमसीएसमोर मांडतील. पुरावे मांडूनही न्याय मिळाला नाही तर मग मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा पर्याय आपल्याला स्विकारावा लागेल, असं मुंडे यांनी आधीच स्पष्ट केलंय. आपलं घर मुंबईत आहे. तसंच आपण मुंबईतच टॅक्सही भरत असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय.
‘एमसीए’च्या निवडणुकीत मुंडेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. ‘एमसीए’ निवडणुकीसाठी उमेदवार मुंबईचा रहिवासी असायला हवाय मात्र मुंडेंच्या पासपोर्टवर बीडचा पत्ता असल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आलाय. यामुळं गोपीनाथ मुंडे यांना जोरदार धक्का बसला होता. मुंडेंनी यावर आक्षेप नोंदवलाय. ‘मी मुंबईचाच रहिवासी आहे... आणि मी माझा आयकरही मुंबईच्याच पत्त्यावर भरतो... माझ्या पासपोर्टवरदेखील मुंबईचाच पत्ता आहे... मग, माझा अर्ज बाद कसा केला जाऊ शकतो?’ असं मुंडे म्हणाले होते.
महत्त्वाचं म्हणजे, ही निवडणूक मुंडे विरुद्ध पवार अशी रंगण्याची चिन्हं दिसत होती. मुंडेंचा अर्ज बाद झाला तर पवार हे बिनविरोध निवडून येतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.