www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वन-डे मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे तर सीरिजमध्ये आपली आघाडी आणखी वाढवण्यासाठी कांगारुची टीम प्रयत्नशील असेल.
पुण्यामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या मानहानिकारक पराभवाची सव्याज परतफेड करण्याची संधी धोनी अॅन्ड कंपनीला मिळणार आहे. 72 रन्सनं पराभूत करत कांगारुंनी पहिल्याच मॅचमध्ये भारतीय टीमला पराभवाची चव चाखायला लावली होती. या मॅचमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर कांगारुंची भारतीय टीमवर भारी पडली होती. त्यामुळेच आता जयपूर वन-डेमध्ये धोनीब्रिगेडसमोर कमबॅक करण्याचं मोठ आव्हान असणार आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये भारतीय टीमनं सपशेल निराशा केली होती. विराट कोहली आणि रोहित शर्माचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला पहिल्या वन-डेत आपली छाप सोडता आली नव्हती. आता, रोहित आणि विराटकडून या वन-डेमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा टीमला असणार आहे. तर शिखर धवन, सुरेश रैना, सिक्सर किंग युवराज सिंग आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्यावरही आपल्या टीमसाठी मोठी इनिंग खेळण्याची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाच्या बॅट्समनप्रमाणे बॉलर्सनीही सपशेल निराशा केली होती. त्यामुळे दुसऱ्याच मॅचमध्ये भारतीय बॉलर्ससमोर कांगारु बॅट्समनना रोखण्याचं मोठ आव्हान असेल.
स्पिनर्सकडूनही अपेक्षित कामगिरी झालेली नाही. त्यामुळे आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजाच्या कामगिरीवरही बरच काही अवलंबून असणार आहे. दुसरीकडे कांगारुंनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी केली होती. त्यामुळे पहिल्या मॅचमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी जॉर्ज बेली अॅन्ड कंपनी आतूर असेल. या सीरिजमध्ये 6-1 नं बाजी मारल्यास कांगारु वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान होणार आहेत. त्यामुळे कांगारुंना नंबर वन होण्यापासून रोखण्यासाठी भारतीय टीमला या मॅचममध्ये विजयश्री मिळवावीच लागणार आहे. आता, इनफॉर्म कांगारु टीम इंडियावर भारी पडतात की, धोनीची टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक मिळवण्यात यशस्वी ठरते याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.