www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र सिंग धोनी हा फोर्ब्सच्या यादीत सगळ्यात जास्त कमावणारा खेळाडू म्हणून १६व्या स्थानी पोहोचलाय. जून २०१२ ते जून २०१३ दरम्यान धोनीनं ३.१५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १८० कोटींची कमाई केली. धोनीच्या या उत्पन्नात त्याचा पगार, बोनस, पुरस्कारातून मिळालेला पैसा आणि जाहिरातीतून झालेल्या कमाईचा समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार असंच म्हणावं लागेल की धोनीनं फॉर्म्युला वन चालवून फर्नाडो अलोंसो (१९), लुईस हेमिल्टन (२६), टेनिस स्टार नोव्होक जोकोव्हिच (२८), राफेल नदाल (३०) आणि सुसाट उसेन बोल्ट (४०) लाही मागं टाकलंय. मागील वर्षी धोनी फोर्ब्सच्या यादीत ३१व्या स्थानावर होता. या यादीत भारताचा दुसरा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन १२५ कोटींची कमाई करुन यादीत ३१व्या स्थानावर आहे.
गोल्फ स्टार टायगर वुड्स हा ७.८ कोटी डॉलरची कमाई करुन फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. टेनिस स्टार रॉजर फेडरर ७.१ कोटी डॉलर कमवत दुसऱ्या स्थानी आहे. तर ६.१ कोटी डॉलरसह बास्केटबॉल खेळाडू कोबे ब्रायंट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महिला खेळांडूची यादी पाहता टेनिस स्टार मारिया शारापोव्हा २.९ कोटी डॉलर कमवून पहिल्या स्थानावर आहे. तर टेनिस स्टार सेरेना विल्यियम्स २ कोटी डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची टेनिस स्टार ली नानं १.८ कोटी डॉलर कमवत यादीत तिसरा क्रमांक मिळवलाय. तर बेलारुसची टेनिस प्लेअर व्हिक्टोरिया एजारेंका ही १.५ कोटी डॉलर कमवून चवथ्या क्रमांकावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.