www.zee24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या कोणत्याही सामन्यावर आणि खेळाडूवर बंदी असणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सत्र सुरळीत पार पडणार आहे.
खेळाडू आणि समालोचक वगळता इंडिया सिमेंट्सशी संबंधित इतर व्यक्तींना मात्र आयपीएलमध्ये सहभागास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. त्यामुळं किमान कुठल्याही संघावर बंदी न घातल्यामुळं आयपीएलच्या आयोजकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष निवड झाल्याने त्यांना आता कॉमेंट्री करता येणार नाही. कारण तशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एन. श्रीनिवासनच्या स्थानी सुनील गावस्कर यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. शुक्रवारी त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सट्टा आणि फिक्सिंग प्रकरण जून २०१३चे आहे. आयपीएल-६ दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी याला विरोध दर्शवला होता. मुंबई हायकोर्टानेदेखील ही समिती अवैध असल्याचा निर्णय दिला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.