www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विविध वाद-अडचणींवर मात करत इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) सातवे पर्व बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र विविध वादांची किनार, संघांचे बदलते स्वरूप, निवडणुकांमुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणारा पहिला टप्पा या घटकांमुळे प्रायोजकांनी फ्रँचायझींकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट चित्र आहे.
पहिल्या काही हंगामांत संघांचं प्रायोजकत्व मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये होड लागली होती. मात्र आता प्रायोजकांसाठी फ्रँचायझींची शोधाशोध सुरू असल्याची स्थिती आहे. कोका-कोलानं मुंबई इंडियन्सशी तीन वर्षांचा करार केला होता. मात्र यंदाचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही तास बाकी असतानाही कोका-कोलानं मुंबई इंडियन्सशी करार केलेला नाही.
आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्ससारखा संघ असो, की सनरायजर्स हैदराबादसारखा नवखा संघ.. प्रत्येक संघ दमदार प्रायोजकांच्या प्रतिक्षेत आहेत. यंदाच्या वर्षी आम्हाला प्रायोजक शोधताना बऱ्याच अडचणी येत आहेत, असं किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक मोहित बर्मन यांनी सांगितलं. आयपीएलसंदर्भात उद्भवलेले वाद, स्पर्धेच्या आयोजनाबाबत असलेली संदिग्धता आणि पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असल्याचा फटका फ्रँचायझींना बसला आहे.
गेल्या वर्षी आयपीएलच्या सहाव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडे १५ प्रायोजक होते. यंदा ही संख्या १५ वरून दोनवर आल्याचे बर्मन यांनी सांगितलं. एनव्हीडी सोलार ही कंपनी किंग्ज इलेव्हन संघाची मुख्य प्रायोजक होती. यंदा मात्र केवळ यूएसएल आणि टीके स्पोर्ट्स या प्रायोजकांनीच पुढाकार घेतला आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचीही कहाणी फारशी वेगळी नाही. मुथूट फायनान्स हे डेअरडेव्हिल्स संघाचे मुख्य प्रायोजक होते. यंदा त्यांनी दिल्लीशी कोणताही करार केलेला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर दिल्लीला ई-कॉमर्समध्ये मोठं नाव असलेल्या क्विकरनं प्रायोजकत्व दिलंय.
कोका-कोला, बजाज अलायन्स, मॅट्रिक्स तसेच पॅनासोनिकनं यंदा स्पर्धेपासून दूर राहण्याचं ठरवलंय. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांना कसा प्रतिसाद मिळतो, टीव्हीवर किती प्रेक्षक सामने पाहतात, हे पाहून आम्ही कदाचित जाहिराती देण्याचा विचार करू, असं कोका-कोलाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
या संघांच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे प्रायोजक मिळवण्यात यशस्वी ठरलेत. मात्र प्रायोजकांच्या दरामध्ये २५ ते ३० टक्क्य़ांनी घट झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.