www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.
वेस्ट इंडिजच्या टेस्ट संघाच्या कॅप्टन म्हणून भारतीय वंशाचा विकेट किपर दिनेश रामदिन याची निवड करण्यात आली. क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतरच सॅमी आपली निवृत्ती जाहीर केलीय. सॅमीनं बोर्डाच्या निर्णयाचं स्वागत करत रामदिनलाही शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्यानं नाराजीतून निवृत्तीचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
सॅमीकडून आधी वनडे संघाचे नेतृत्व काढून घेऊन ड्वेन ब्राव्हेकडे ती जबाबदारी देण्यात आली त्यानंतर आता त्याच्याकडून टेस्ट टीमचीही कॅप्टनशीप काढून घेण्यात आलीय. मात्र, टी-२० संघाचं कर्णधारपद सॅमीकडंच राहणार आहे.
३० वर्षीय सॅमी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ३८ टेस्ट मॅचेस खेळला आहे. त्यानं आपल्या निवृत्तीचा निर्णय वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला असून आपल्याला खेळाडू आणि कर्णधार म्हणून निवड समिती सदस्य आणि संघ व्यवस्थापनाचं मोठं सहकार्य मिळाल्याचं त्यानं म्हटलंय.
दरम्यान, वेस्ट इंडिज कसोटी संघाचा कर्णधार बनलेला २९ वर्षीय रामदिन हा विकेट किपर आणि बॅट्समन असून ५६ टेस्ट मॅचेसचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. येत्या ८ जूनपासून मायदेशी होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याला पहिली परीक्षा द्यावी लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.