ट्राय सीरिज : टीम इंडिया लंकेला देणार धक्का?

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात आज ट्राय सीरिजची दुसरी लीग मॅच खेळली जाणार आहे. जमैकाच्या किंग्जटन पार्क स्टेडियमवर रंगणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्स टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यास आतूर असतील.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 2, 2013, 09:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, किंग्जटन
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात आज ट्राय सीरिजची दुसरी लीग मॅच खेळली जाणार आहे. जमैकाच्या किंग्जटन पार्क स्टेडियमवर रंगणाऱ्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्स टूर्नामेंटमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यास आतूर असतील. तसंच लंकन टीम चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी-फायनलमध्ये झालेल्या भारताविरूद्ध पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठीही उत्सुक असतील.
वेस्ट इंडिजविरूद्ध ट्राय सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचं बिरूद मिरवणाऱ्या टीम इंडियाला एक विकेटने पराभवाचा धक्का पचवावा लागला. या पराभवामुळे हवेत उडणारं भारतीय टीमचं विमान एका झटक्यात जमिनीवर आलं आहे. त्यामुळे तिहेरी सीरिजच्या श्रीलंकेविरूद्ध दुसऱ्या मॅचमध्ये धोनी ब्रिगेडला सर्वच स्तरांतील आपला खेळ उंचवावा लागेल.
भारताचं बलस्थान असणारी बॅटिंग विंडिजविरूद्ध पहिल्या मॅचमध्ये गडगडली होती. त्यामुळे इनफॉर्म ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मासह शिखर धवनलाही जबाबदारीने खेळ करावा लागेल. तर सुरेश रैनासह, विराट, दिनेश कार्तिक आणि कॅप्टन धोनीलाही मोठी खेळी करण्यावर भर द्यावा लागेल. भारतीय बॅट्समन्सना आव्हान असेल ते लंकन फास्ट बॉलर्सचं... लसिथ मलिंगा, कुलसेकरा, मॅथ्युज या वेगवान त्रिकुटासह हेराथ आणि अजंथा मेंडिस या स्पिनर्ससमोर वेगाने रन्स करण्याची जबाबदारी भारतीय बॅट्समन्सना पार पाडावी लागेल. लंकेच्या तुलनेत भारतीय बॉलिंगही समतोल वाटत आहे. उमेश यादव, ईशांत शर्मासह भुवनेश्वर कुमारचा मारा लंकन बॅट्समन्सना अडचणीत आणू शकतो तर रवींद्र जाडेजासह आर. अश्विनचा स्पिन अटॅक लंकन बॅट्समन्सची परिक्षा पाहणारा ठरेल. त्यामुळे थरंगा, जयवर्धने, संगकारा या अनुभवी टॉप ऑर्डरसह चांडिमल, कॅप्टन मॅथ्युज आणि थिरिमन्ने यांना भारताविरूद्ध सावध खेळ करावा लागेल.

भारत-श्रीलंका मॅचमध्ये टीम इंडिया लंकेविरूद्ध आपला विजयी धडाका कायम राखणार की लंकन टीम भारताविरूद्ध विजयाची नोंद करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.