www.24taas.com, झी मीडिया, जमैका
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया आज लढणार आहे वेस्ट इंडिजशी. श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर आता कॅरेबियनही टीम इंडियाशी मुकाबला करायला सज्ज झालेत. टीम इंडियाही सध्या फुल फॉर्मात आहे.. ट्राय सिरीजमधील हा इंडियाचा पहिलाच सामना आहे.
श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत वेस्ट इंडिजने तर या सिरीजची धमाकेदार सुरुवात केलीय. आता टीम इंडियासमोरही विजयाची मालिका चालू ठेवण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. दोन्ही संघांना एकमेकांची बलस्थाने आणि कमकुवत गोष्टी माहीत आहेत. कारण या दोन्ही संघातील खेळाडू आयपीएलमध्ये एकमेकांसोबत खेळलेत. महेंद्रसिंग धोनी आणि ब्रॉव्हो हे दोघे चेन्नईसाठी खेळलेत तर विराट कोहली आणि क्रिस गेल बंगळूरकडून खेळले आहेत. या सामन्यात सलामी जोडीसाठी शिखर धवन आणि रोहित शर्माच असतील. दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी खेळणार आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. फलांदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही टीम इंडिया आघाडीवर आहे. परंतु क्रिस गेलचे प्रदर्शन, स्पिनर सुनील नारायणची गोलंदाजी तसेच वेगवान गोलंदाज केमार रोच आणि रवि रामपाल यासर्वांचे खडतर आव्हान इंडियन ब्रिगेडसमोर आहे. त्यामुळे आता जोरदार तयारीनिशी टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.