www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी सेनेचा वीर विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयनं प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी केली आहे. त्यासोबतच, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी केंद्राच्या क्रिडा मंत्रालयाला सुचवण्यात आलंय.
वनडे असो किंवा टी-२० सामना, टीम इंडियाच्या मधल्या फळीला आधार देण्याची जबाबदारी विराट कोहलीनं चोख बजावली आहे. खराब सुरुवातीनंतर संघाचा डाव सावरण्याची, धावसंख्येला आकार देण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि त्यासोबत संघाच्या उप-कर्णधारपदाची धुराही त्यानं समर्थपणे सांभाळलेय. कोहलीची ही यशस्वी घोडदौड लक्षात घेऊनच, बीसीसीआयनं अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस केलेय.
क्रीडाक्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणा-या, महत्त्वपूर्ण योगदान देणा-या खेळाडूंना आणि गुरूंना दरवर्षी केंद्र सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद्र पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदा अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयनं कोहलीलाच्या नावाला हिरवा कंदीव दाखवला आहे.
दरम्यान, खेलरत्न पुरस्कारासाठी सोमवारपर्यंत दोन नावं क्रीडा मंत्रालयाकडे गेली आहेत. त्यात लंडन पॅरालिम्पिक्समध्ये `रुपेरी` कामगिरी करणारा एच एन गिरिशा आणि हॉकीपटू संदीप सिंग यांचा समावेश आहे.