लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....

अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी!

Updated: Nov 13, 2012, 08:20 AM IST

www.24taas.com, मुंबई
अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी! सर्वांना हवीशी वाटणारी, नात्यांचे संबंध सांगणारी आणि जोपासणारी. दिवाळी म्हटलं की डोळयांसमोर येतो तो दिव्यांचा लखलखाट, फराळाचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी, मनाला आपोआपच उभारी येते. आनंदाने दिवाळीचं स्वागत अंत:करणापासून केलं जातं.
नरक चतुर्दशीला जाग येते ती पहाटेच्या फटाक्यांच्या आवाजाने. मुलांना तर फार आवड असते. सर्वच लोक पहाटे उठतात नि घराघरांत सगळीकडेच दिवे लागतात. थंडीच्या गोड गारव्यात सुवासिक तेलरने मॉलिश करतात आणि सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करतात. उटण्याचा हवाहवासा वाटणारा सुगंध दरवळत राहतो. एक वेगळीच प्रसन्नता मनाच्या गाभा-यात भरून राहते. मात्र जो आळशी असेल आणि लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करणार नाही तो नरकात जाणार असे म्हणतात. ह्या भितीमुळे तरी सर्वच लवकर उठून अभ्यंगस्नान करतात.
अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येते. यावरून अमावस्येचे महत्त्व अजूनही लक्षात येते. प्रत्येक स्त्री मुहूर्ताप्रमाणे संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी करते. झेंडुच्या फुलांना ह्या दिवशी फार महत्व. झेंडूची फुले आणून माळा करतात. दरवाजासाठी, वाहनासाठी, देवांसाठी माळा तयार होतात आणि पूजेसाठीही फुले लागतातच. पिवळा सुंदर टवटवीत रंग मन वेधून घेतो. लक्ष्मीच्या फोटोची आरास रांगोळया काढून करतात.
लक्ष्मीची पावले दाराबाहेरून पूजेच्या चौरंगापर्यंत काढतात. नवे अलंकार व नवे कपडे घालून सर्वच तयार होतात. साळीच्या लाह्या, बत्तासे, खोबरे नि या बरोबर दुसराही नैवेद्य करतात. मनोभावे लक्ष्मीची पूजा करून आरती करतात. पूजा होताच सगळीकडे फटाके वाजू लागतात. बालगोपाळांबरोबर मोठेही सामील होतात. आकाशात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी दिसते. प्रत्येकाच्या मनातील आनंद द्विगुणीत होतो.