स्पेशल चहा.....(कथा)

माणसाच्या बाह्य स्वरुपावरून म्हणजे त्याने घातलेल्या कपड्यांवरून आपण तो कोण असेल त्याला किती समजत असेल याचा अंदाज बांधत असतो. काळवटलेला चेहरा, मळकट बनियान, निळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर एक फडकं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 1, 2013, 08:31 PM IST

.
.

माणसाच्या बाह्य स्वरुपावरून म्हणजे त्याने घातलेल्या कपड्यांवरून आपण तो कोण असेल त्याला किती समजत असेल याचा अंदाज बांधत असतो. काळवटलेला चेहरा, मळकट बनियान, निळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर एक फडकं. अंगाच्या रोमारोमातून वाहणारे असंख्य धर्मबिंदू, पातेल्यातील चहा चमच्याने लिलयापणे वर-खाली करणारा तो चहावाला चहाबरोबर जीवनाचे असे काही बाळकडू पाजेल की त्याने जीवनाकडे पाहण्याचा आणि छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने सदैव भोकाड पसरणारी आपली शहरी वृत्ती गळून पडल्याचा प्रत्यय पंढरीच्या वाटेवर आला.
पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला चाललेला वैष्णवांचा थवा... ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अखंड गजर... वातावरणात चैतन्य, उत्साह आणि भक्ती यांची चहूऔर झालेली शिंपण...रस्त्याचा दुतर्फा माऊलींच्या भक्तांची जमलेली गर्दी...असमंतात एक विलक्षण पावित्र्याचा अनुभव... तळपत्या सूर्यानेही दिवसभर वारक-यांबरोबर राहून या अनुपम सोहळ्याला लावली हजेरी... आळंदीहून पंढरपूरला वारक-यांबरोबर वारीचं वार्तांकन करण्यासाठी चालत होतो. पहिलीच वेळ असल्याने उत्साह होता. त्यामुळे वारक-याबरोबर चालण्यात आनंद वाटत होता. पण आता बातमी देण्याची धावपळ सुरू होती, त्यामुळे थोडे टेन्शन आले होते. उतरतीच्या उन्हाने अंगातून श्वेतगंगा वाहू लागल्या होत्या. पायात गोळे आले होतं. अंगही दुखायला लागलं होतं. डोकं जरा किणकिण दुखतं होतं. तेवढ्यात ‘प्रातः’ या वृत्तपत्राचे माझे मित्र शंकर गिरमिरे म्हणाले, केशवराव चला एकदम फक्कड चहा पिऊ या. तशी मला काही करण्याची इच्छा नव्हती बातमीचं टेन्शन होतं. त्यामुळे मी मान हालवून आणि खिशातून रुमाल काढत घामाने डबडबलेला चेहरा पुसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागलो. वारीच्या वाटेवर सागर चहा हा फेमस चहा आहे. तब्बल ८० ते ९० गाड्या एकट्या सागर चहा नावाची पाटी लावून वारक-यांच्या या महासागरात त्यांची चहाची तल्लफ भागवतात. त्यामुळे त्या गाड्यांवर नेहमी प्रमाणे झुंबड लागली होती. त्यामुळे मी शंकर आणि त्याचेच कार्यालयीन सहकारी विलास बोचरेंना म्हणालो, ‘चला, लवकर बातमी द्यायची की नाही? त्या साध्या गाडीवर चहा घेवू.

शंकर आणि विलास यांनाही बातम्या द्यायच्या होत्या त्यामुळे त्यांनी लगेचच माझ्या सूचनेला सहमती दर्शवली आणि साध्या हातगाडीवर लावलेल्या एका चहाच्या टपरीकडे आगेकूच केली. काळवंटलेला चेहरा, अनेक दिवसांपासून पुरेशी झोप नसल्याने डोळे सुचलेले, डोळ्याच्या कडा लालबुंद झालेल्या, गेल्या १० दिवसांपासून वारीत चालत असताना डोक्यावर तेलाचं टिपूसही न पडल्याने अस्थावस्थ आणि विचित्र वाढलेले केस, दररोज तोच बनियान घातल्याने त्याला आलेला पिंगटपणा आणि त्यात उठून दिसणारे ते चहाचे आणि स्टोव्हच्या काजळीचे काळे डाग, असा अवतार असलेल्या एका साध्या चहाच्या गाडीवर आम्ही तिघे थडकलो. पातेल्यातला चहा चमच्या लिलयापणे वर-खाली करून कडांना लागलेली चहाची भुकटी पातेल्यात सरकवताना तो सराईत चहावाला असल्याचे आमच्या लक्षात आले. हे सर्व करत असताना त्याचा तोंडाचा पट्टाही चालू होता. ‘चला चहा गरम, चहा गरम’ ‘पंढरीची गोडी चहामध्ये थोडीथोडी’ असे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत होता.
आम्ही तिघे त्याच्या गाडीजवळ गेल्यावर त्याने आम्हाला विचारले साहेब, किती बोला. त्यावर विलास बोचरे म्हणाले, फक्कड तीन स्पेशल करं. त्याच्या स्टोव्हवर साधा चहा उकळ्या घेऊन थुईथुई नाचत होता. तो म्हणाला, साहेब पाच मिनिटं! मी म्हटलं अरे यार लवकर कर बातमी द्यायची. तुला शक्य नसेल तर दुसरीकडे जातो. तो म्हणाला, साहेब पाच मिनिटं द्या लगेच देतो. त्याने जर माझ्यासारखा उध्दटपणा दाखवला असता तर पुढे त्याने जे काही सांगितलं त्यापासून मी वंचित राहिलो असतो. पण पंढरीच्या पांडुरंगाला थोडी असं होवू द्यायचं होतं. शंकरराव म्हणाले, मस्त चहा कर दिवसभराचा थकवा निघायला पाहिजे. मागच्या गावाला जाऊन बातमी द्यायची आहे. जरा डोकं चालायला पाहिजे. बातमी द्यायची आहे, हे म्हटल्यावर त्याचे ते लालबुंद डोळे जरा चमकले होते. त्याच्या चेह-यावर एक प्रश्न दिसत होता. तो या पत्रकारांना विचारावा का असे त्याला वाटत होते. मग त्याने विचारूनच टाकलं.
साहेब, तुम्ही पत्रकार का? कोणत्या पेपराचे? विलास बोचरे म्हणाले, मी आणि हे (शंकररावांकडे बोट दाखवून) ‘प्रातः’ या वृत्तपत्राचे बातमीदार आहोत. तर (माझ्याकडे बोट दाखवून) हे मुंबईवाले ‘जनता टाइम्स’चे पत्