www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा जाहिरातींचं पेव फुटलं आहे. मात्र शहरात सुरु असलेली फलकबाजी कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाही. तर हे होर्डिंगवॉर खासगी क्लासेस आणि शिक्षणसंस्था चालकांमध्ये आहे. शहरातील जवळपास सर्वच चौक आणि रस्ते जाहिरात फलकांनी व्यापलेत. वीजेचे पोल, महाविद्यालयांचे गेट, भिंत, उड्डाणपूल अशा प्रत्येक ठिकाणी खासगी क्लासेस आणि महाविद्यालयांची जाहीरात दिसून येते.
त्यात दहावी, बारावीतल्या गुणवंतांचे फोटोही झळकतात. विद्यार्थी आणि पालकवर्गाला आकर्षित करण्यासाठीच जाहीरातबाजी आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकीनिमित्तानं नवनिर्वाचित नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदनाचे फलक झळकत होते. ते काढले जात नाहीत तोपर्यंत दादा, भाऊंच्या वाढदिवसाचे आणि इतर फलक शहराच्या सौंदर्याला गालबोट लावतायेत.
पालिकेकडून केवळ कारवाईचं आश्वासन मिळतं. केवळ मोठमोठ्या जाहीराती बघुन विद्यार्थी वर्ग आकर्षित होतो का ? खासगी शिक्षणसंस्था आणि क्लासेसचा पाया जाहीरात आणि दिखाव्यावर असतो का ? असे प्रश्न यातून उपस्थित होतात.