मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश, नवं दप्तर घेऊन शाळेत जावं, अशी सगळ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण नाशिक महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन वार्षिक परीक्षा आली, तरीही गणवेश मिळत नाहीत. वर्षानुवर्षं हेच चालत आलंय. यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार, याचं उत्तर कुणाहीकडे नाही.
नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सलग दोन वर्षं विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळालं नाही. यंदाही तीच परंपरा कायम राहण्याची चिन्हं आहेत. गेल्या वर्षीचे गणवेश जेमतेम वार्षिक परीक्षेच्या आधी म्हणजे फेब्रुवारीत मिळाले होते. या सगळ्या सावळ्या गोंधळाला कारणीभूत ठरलाय तो महापालिका आणि शिक्षण मंडळातला वाद.
शिक्षण मंडळाकडून गणवेश खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत. तर इतर साहित्यासाठी मनपा प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती शिक्षणाधिका-यांनी दिलीय. महापालिकेचं अंदाजपत्रक तयार नाही. आचारसंहिता आणि पूर्णवेळ आयुक्त नसल्यानं अनेक कामं रखडलीयत. त्यातच विद्यार्थ्यांचा गणवेशही लालफितीत अडकलाय.
दरवर्षी पहिल्या दिवशी मिळणारा गणवेश १५ ऑगस्टला मिळणार असं आश्वासन दिलं जातं. ती डेडलाईन गेली की दिवाळी भेट म्हणून गणवेश मिळण्याचं गाजर दाखवलं जातं. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थी नव्या गणवेशात दिसतील, अशी घोषणा होते.... विद्यार्थी एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत उत्तीर्णही होतात पण गणवेश काही मिळत नाहीत, यंदाचं वर्षही हीच परंपरा कायम ठेवणार अशी सध्या तरी चिन्हं आहेत