www.24taas.com, मुंबई
एस.के.सोमय्या महाविद्यालयाच्या बीएमएमच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेच्या निमित्ताने एक विशेषांक प्रकाशित केला. कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीतील कोणतीही एक कादंबरी, काव्यसंग्रह, नाटक याची निवड करुन त्यावर लेख लिहिण्याचं निश्चित करण्यात आलं.
मराठी माध्यमाच्या बॅचमधील किशोरी बावदाणे, प्राची ढोले, नमिता चव्हाण, उर्मिला खांडकर, अनुप्रिया सोनावणे, प्रिया मोरे, रेश्मा पाफाळे, दर्शना कांबळी, भरत पवार, अमोल तेलंग आणि तुषार ओव्हाळ या ११ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कुसुमाग्रजांच्या साहित्यावर लिहिण्यासाठी त्यांना कुळगाव-बदलापुरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे श्री आणि सौ श्यामसुंदर जोशी, प्र.ग.देशपांडेसर यांच्या बहुमोल मार्गदशनाचा लाभ झाला.
पॉप्युलर प्रकाशनाचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकात दोन तास या मुलांसाठी राखून ठेवले. रामदास भटकळ यांनी कुसुमाग्रजांसोबत आपल्या पन्नास वर्षांच्या स्नेहसंबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. या अंकाच्या संपादनाची जबाबदारी स्नेहल बनसोडेने पार पाडली तर मुखपुष्ठ अरविंद परुळेकर यांनी तयार केलं.
रामदास भटकळांची मुलाखत आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या श्री.शं.सराफ लिखीत 'कहाणी कुसुमाग्रजांची' या आगामी पुस्तकातील एक प्रकरण हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ठ्यं म्हणता येईल.