भारतीय विद्यापीठांची बेअब्रू

भारतातील शिक्षण पद्धती किती रसातळाला गेलीय, याचा प्रत्यय नुकताच आलाय... जगातील `टॉप 200` विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश झालेला नाही. क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंगमध्ये हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 11, 2013, 10:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,
भारतातील शिक्षण पद्धती किती रसातळाला गेलीय, याचा प्रत्यय नुकताच आलाय... जगातील `टॉप 200` विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश झालेला नाही. क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंगमध्ये हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय...
जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यालय म्हणून नालंदा आणि तक्षशिलाचा वारसा आपण मिरवतो... ऋग्वेद काळापासून चालत आलेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जगभरात कौतुक केले जात असे. मात्र अलिकडच्या काळात हा इतिहास पार धुळीला मिळालाय... जागतिक विद्यापीठांच्या ताज्या क्रमवारीने तर भारतातील शिक्षण व्यवस्थेचे पार धिंडवडे काढलेत.
क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंगने मंगळवारी ही क्रमवारी प्रकाशित केली. त्यात एमआयटीने लागोपाठ दुस-यांदा अव्वल स्थान कायम राखलंय. त्यापाठोपाठ हार्वर्ड आणि केंब्रिज या विद्यापीठांचा नंबर लागतो. जगातील टॉपच्या 200 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याचे धक्कादायक वास्तव या क्रमवारीने उघड केलंय.
या यादीत पहिल्या टॉपच्या 400 विद्यापीठांमध्ये भारताच्या केवळ पाच आयआयटींचा समावेश आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे 2012 नंतर भारतीय विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये आणखी घसरण झालीय. आयआयटी दिल्ली 222 व्या स्थानी, आयआयटी मुंबई 233 व्या, आयआयटी कानपूर 295 व्या, आयआयटी मद्रास 313 व्या आणि आयआयटी खडगपूर 346 व्या स्थानी आहे. या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ 601 व्या स्थानी, तर विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणे विद्यापीठ 701 व्या स्थानी आहे.
टॉप 800 च्या यादीत भारतातील केवळ 11 शिक्षणसंस्थांचा समावेश झालाय. जागतिक विद्यापीठांची ही क्रमवारी भारतीयांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारी आहे. शिक्षणाचा दर्जा किती ढासळलाय, हेच त्यावरून स्पष्ट होतंय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.