नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. याबाबत केंद्राने अध्यादेश काढला. या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळली.
‘नीट'मधून तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांना यंदा ‘नीट' सक्तीची नसेल.
देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश ‘नीट‘ या एकाच प्रवेश प्रक्रियेद्वारे करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ही सक्ती पुढील वर्षापासून करावी आणि यंदाचे प्रवेश ‘सीईटी‘द्वारे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘नीट'ची पुढील वर्षापासून सार्वत्रिक अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढला होता.