देशातील शिक्षण व्यवस्थेला जवळपास एक दशक पाठबळ पुरविणाऱ्या अझिम प्रेमजी फाऊंडेशनने आता एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य बोर्डाशी संलग्न स्थानिक भाषेत मोफत शिक्षण देणाऱ्या दोन शाळा स्थापन करण्याची योजना आखली आहे.या योजने अंतर्गत १३०० शाळा स्थापन करण्यात येणार असून तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. अझिम प्रेमजी फाऊंडेशनची योजना यशस्वी झाल्यास ती सरकारी शिक्षण व्यवस्थे खालोखाल शिक्षण देणारी यंत्रणा ठरेल. सरकारी शाळांच्या धर्तीवर बालवाडी ते बारावी पर्यंत शिक्षण अझिम प्रेमजी फाऊंडेशनच्या शाळा उपलब्ध करुन देतील. विकसीत राष्ट्र होण्याच्या दृष्टीने दर्जेदार शिक्षण ही मुलभूत बाब असल्याचं प्रेमजी यांनी म्हटलं आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात दोन शाळा सुरु करण्याची कल्पना फाऊंडेशनच्या २००१ पासूनच्या कामाचा आढावा घेताना पुढे आली. अझिम प्रेमजी फाऊंडेशनचे सीईओ दिलीप रांजेकर यांच्या मते विविध प्रकल्पांना पाठबळ पुरविण्याचा पुढचा टप्पा संस्थात्मक उभारणीचा विचार पुढे आला. शाळा उभारणीमुळे अपेक्षित बदल अधिक परिणामकारक रित्या घडवून आणता येईल असं फाऊंडेशनमध्ये कार्यरत असणाऱ्यांचे मत असल्याचेही रांजेकर यांनी सांगितलं. आरोग्य आणि षोषण यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळा भर देणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या शैक्षणिक दृष्ट्य़ा मागासलेल्या भागांना प्राधान्यक्रम देण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे आणि सरकारी किंवा खाजगी शाळांबरोबर स्पर्धा करण्याचा विचार नाही असंही रांजेकर यांनी सांगितलं.
येत्या दीड वर्षात कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड आणि छत्तीसगड मध्ये सात शाळा सुरु करण्यात येणार आहेत. सन २०२५ पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३०० शाळा सुरु झालेल्या असतील असा विश्वास फाऊंडेशनने व्यक्त केला आहे. कर्नाटक राज्यातील यादगीर आणि कोप्पलमध्ये पहिल्या दोन अझिम प्रेमजी फाऊंडेशन शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. कर्नाटक सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण या जिल्ह्यांमध्ये आहे. तर राजस्थानमधल्या टोंक आणि सिरोही तर उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी आणि रुद्रपूर आणि छत्तीसगडमधल्या दमतरी इथे येत्या दीड वर्षात शाळा स्थापन करण्यात येणार आहेत.