www.24taas.com, चंद्रपूर
निवडणुका आणि ओल्या पार्ट्या हे समीकरण काही आता नवं राहिलेलं नाही. मात्र मटणाची पार्टी एका ठराविक विक्रेत्याकडील बकरे खरेदी करुन केल्यास निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही कधी ऐकलंय का, मात्र असं घडलं आहे. काय आहे हा रिपोर्ट.
चंद्रपुरातल्या सिव्हील वॉर्डात राहणारे संजय काळे. काळे यांनी छंद म्हणून आपल्या घरात कोंबड्या आणि बक-या पाळण्यास सुरुवात केली. मात्र आता हेच बकरे काळे यांच्यासाठी लकी ठरत आहे. कारण त्यांच्याकडच्या बक-यांना मागणी वाढली आहे. येत्या १५ एप्रिलला चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका म्हटल्या की मद्य आणि मटणाची पार्टी आलीच. त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्याकडील बकरे खरेदी करण्यासाठी संभाव्य उमेदवारांची गर्दी होत आहे.
कारण गेल्या निवडणुकांमध्ये काळे यांच्याकडून बकरे खरेदी करुन पार्ट्या केलेले बहुतांशी उमेदवार निवडून आलेत असा जावईशोध काहींनी लावला आहे. त्यामुळे काळे यांच्याकडील बकरे खरेदी करुन पार्टी म्हणजे हमखास विजय असा समज करुन अनेक संभाव्य उमेदवारांनी काळे यांच्याकडे बक-यांची नोंदणी केली आहे. संजय काळे यांना मात्र या गोष्टीमागे कोणताही चमत्कार नसल्याचं वाटत आहे. निवडणुकांच्या तोंडावर अशा मटणांच्या पार्ट्या सर्रास होतात. मात्र अशा मटणाच्या पार्टीसह लकी बक-यांच्या जीवावर निवडणुक जिंकण्याची स्वप्न पाहणा-या उमेदवारांचं कर्तृत्व काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="67876"]