www.24taas.com, मुंबई
जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवतं बाजी मारली आहे...काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधकांची मदत घेतलीय..य़ा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहे.. राज्यातील जिल्हापरिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा गजर झाला आहे.
राज्यातील 26 जिल्हापरिषदापैकी 13 जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज करण्यात यश मिळवलंय...त्यामुळे जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे...सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने आपला सहकारी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे.. ठिकठिकाणी शिवसेना, भाजप आणि मनसेची मदत घेऊन राष्ट्रवादीने नंबर वन होण्याची किमया साधली आहे...खरंतर निवडणुकीच्या काळात ज्यांच्यावर कडाडून टिका केली त्याच पक्षांच्या मदतीने सत्तेचा सोपान गाठला आहे..
आज 26 झेडपीतील सत्तेचं समीकरणं पहाता राष्ट्रवादी काँग्रेसने 13 जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदावर तसेच 14 उपाध्यपदावर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 अध्यक्ष तर 4 उपाध्यक्ष पद मिळविण्यात यश आलं आहे...भाजपला 3 अध्यक्ष तसेच 3 उपाध्यक्ष पद मिळाली आहेत. शिवसेनेला 2 अध्यक्ष ,4 उपाध्यक्ष तर इतरांना 1अध्यक्ष आणि 1 उपाध्यक्षपद मिळालं आहे...राज्यातील 26 जिल्हापरिषदांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व सर्वचं विभागात दिसून येईल..काँग्रेसला त्या तुलनेत मर्यादीत यश आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक,सांगली, पुणे,सोलापूर, सातारा,बीड, परभणी,अमरावती,यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्हापरिषदेत अध्यक्षपद मिळवलं आहे ...तर काँग्रेसने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद , नांदेड, लातूर, बुल़डाणा आणि वर्धा जिल्हापरिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे...भाजपने नागपूर, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्हापरिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे...या निवडणुकीत शिवसेनेला हिंगोली आणि जालना या दोन जिल्हापरिषदेत आपला अध्यक्ष बसवता आला आहे...रायगडमध्ये रिपाई ( आठवले गट)चा अध्यक्ष झाला आहे.
हे सगळं राजकीय चित्र पहाता राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना सत्तेपुढे आपल्या विचारधारेचा जणू विसर प़डल्याचं चित्र आहे...नेहमीच जातियदावादी म्हणून हिणवणा-या शिवसेना भाजपला काग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सोबतीला घेतलय...तर भ्रष्टाचारात बुडालेले पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीची संभावना करणा-या शिवसेना, भाजप आणि राज ठाकरेंच्या मनसेनेही ठिकठिकाणी मदतीची रसद पुरवली आहे.
जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले जुने हिशोब चुकते केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे... जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चालीमुळं अनेक ठिकाणी काँग्रेस चारमुंड्या चित झाली आहे...आणि त्यामुळेच आता दोन्ही काँग्रेसमध्ये या कारणावरुन कलगितुरा रंगला आहे.