सावधान... नाशकात जमीन खरेदी करताय!

नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं जमीन विक्री करणा-यांचा सुळसुळाट झालाय. महिनाभरात जमीन व्यवहारात फसवणुकीची पन्नास प्रकरणं समोर आली आहेत.

Updated: Dec 28, 2011, 12:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं जमीन विक्री करणा-यांचा सुळसुळाट झालाय. महिनाभरात जमीन व्यवहारात फसवणुकीची पन्नास प्रकरणं समोर आली आहेत.

 

यातल्या अनेक प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलीये. एरव्ही सुरक्षित समजल्या जाणा-या जमीन व्यवहारात फसवणुकीचे प्रकार वाढलेत.  नाशिकमध्ये जमीन किंवा प्लॉट खरेदी करताय तर सावधान. जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल तर त्याची कागदपत्र आत्ताच तपासा. कारण तुम्ही जी जमीन खरेदी केलीय. ती जमीनही तुमच्या मालकीची नसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये  जमिनीची बोगस कागदपत्र्यांच्या सहाय्य़ानं विक्री करणारी टोळी कार्यरत झाली आहे.

 

एका महिन्यात नाशिकमध्ये अशा प्रकारच्या पन्नास घटना उघडकीस आल्यात. यातल्याच कन्हय्या तेजवाणी या भामट्याला भद्रकाली पोलिसांनी अटक केलीये. त्यानं बनावट कागदपत्रांच्य़ा सहाय्यानं नाशिकच्या एका नागरिकाची जमीन परस्पर दुस-याला विकली आहे.

 

नाशिकमध्ये फसवणुकीची ही पहिलीच घटना नाहीये.  नाशिकच्याच बेलतगव्हाण गावात ११ बनावट पॉवर ऑफ अटर्नीच्या सहाय्यानं जमिनीची विक्री करण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांच्या संगनमतानं अमोल पाल यांचा भूखंड परस्पर विकण्यात आलाय. पंडित कॉलनीतील कोट्यवधी रुपयांचा भूखंड बनावट सातबारा तयार करुन विकण्यात आला. तर मालेगाव दाभाडीत बनावट दस्तावेज तयार करुन शेतजमीन विकण्यात आली.

 

या प्रकरणी ९  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूमाफियांनी घातलेल्या या धुमाकूळामुळं नाशिककरांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालयं. सुरक्षित गुंतवणूक म्हणून जमीन खरेदीकडं पाहिलं जात होतं. मात्र इथंही फसवण्याचे प्रकार वाढल्यानं गुंतवणुकदारांनी व्यवहार करताना दक्षता घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केल आहे.